one arrested for raping girl and to force her into prostitution | तरुणीवर बलात्कार करुन तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्याला अटक
तरुणीवर बलात्कार करुन तिला वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्याला अटक

वास्को: तीन महिन्यांपासून एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलल्याच्या आरोपाखाली वास्को पोलिसांनी मैनुद्दीन पठाण नावाच्या २८ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. बलात्कार व जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलेली ही पीडित मुलगी मूळची दिल्लीची असल्याचे तपासणीत उघड झाले असून मागच्या काही काळापासून ती गोव्यात वास्तव्य करत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी (दि. १३) उशिरा रात्री नवेवाडे, वास्को भागात राहणाऱ्या मैनुद्दीत पठाण यास अटक करण्यात आली. मैनुद्दीन हा ‘पेंटर’चे काम करत असून त्याच्याविरुद्ध २० वर्षीय तरुणीवर बलात्कार तसेच तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवल्याची तक्रार येताच त्वरित कारवाई करून त्याला अटक केली. पीडित तरुणी मूळची दिल्लीची रहिवासी असून ती काही काळापूर्वी गोव्यात आल्यानंतर तिची मैनुद्दीनशी ओळख झाली. मैनुद्दीनने प्रथम तिच्याशी मैत्री करुन तिच्याशी विवाह करण्याचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्याने तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलून तिला वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवण्यास सुरुवात केली.

आपल्यावर गेल्या तीन महिन्यांपासून होत असलेल्या अत्याचाराबाबत त्या तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी मैनुद्दीन विरुद्ध भादस ३७०, ३७६, ५०६, व ३२३ कलमाखाली तसेच आयटीपीए कायद्याच्या कलम ३, ४, ५ व ७ खाली गुन्हा नोंद करून त्याला बुधवारी उशिरा रात्री अटक केली.

२० वर्षीय तरुणीवर बलात्कार व तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात गुंतवल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या संशयित मैनुद्दीन यास गुरूवारी (दि.१४) वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित तरुणीवर झालेल्या अत्याचारांच्या मागे आणखी कोणाचा हात आहे काय याबाबतही पोलीस सध्या तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे.

Web Title: one arrested for raping girl and to force her into prostitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.