बार्देस : अल्पवयीन मुलीला कोंडून तिला अश्लील शिवीगाळ करून तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके देऊन तिचा लैंगिक छळ करून वेश्या व्यवसायासाठी तिच्यावर जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी रविवारी रात्री एकास अटक केली. विजय राठोड (२३) असे संशयिताचे नाव आहे. संशयित मूळचा विजापूर येथील असून, सध्या तो गिरी येथे राहातो. याबाबत म्हापशाचे पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चाईल्ड लाईन गोवाच्या केंद्र समन्वयक श्रीमती सुझान यांनी म्हापसा पोलिसांत संशयिताविरूद्ध रितसर तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्यात आली. संशयित आपल्या पत्नीसह गिरी येथे राहातो. पत्नीला घरकामात मदतीसाठी संशयिताने ‘त्या’ अल्पवयीन मुलीला पंधरा दिवसांपूर्वी विजापूरहून गिरी येथे आणले होते. संशयित तिला शिवीगाळ व मारहाण करीत असे. संशयिताने तिच्या शरीरावर सिगारेटचे चटकेही दिले होते. याशिवाय तिचा लैंगिक छळ करून वेश्या व्यवसायासाठी तो तिच्यावर जबरदस्ती करीत असे, अशी माहिती मिळाली आहे. चाईल्ड लाईन गोवाच्या केंद्र समन्वयक सुझान डिसोझा यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीची सुटका करून तिची अपना घरामध्ये रवानगी केली व संशयित राठोड यास अटक केली. त्याला एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला. दरम्यान, सोमवारी त्याला रिमांडसाठी बाल न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दोन दिवसांचा रिमांड देण्यात आला. (प्रतिनिधी)
अल्पवयीन मुलीच्या छळप्रकरणी एकास अटक
By admin | Updated: July 22, 2014 07:31 IST