पर्यटकांची संख्या वाढली, रोहन खंवटेंनी दिले पुरावे; आकडेवारी सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 08:16 IST2025-07-25T08:14:35+5:302025-07-25T08:16:13+5:30
विरोधी सूर आळवणाऱ्यांना सुनावले

पर्यटकांची संख्या वाढली, रोहन खंवटेंनी दिले पुरावे; आकडेवारी सादर
लोकमत न्यूज नेटवर्क, पर्वरी : राज्यात पर्यटकांची संख्या घटत असल्याचे कितीही आरोप झाले तरी वास्तव तसे नाही. राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगत काल पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनी विधानसभेत आकडेवारीच सांगितली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी आमदार मायकल लोबो यांनी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचा दावा केला. मात्र, खंवटे यांनी त्यांचा दावा खोडून काढताना पुराव्यासह माहिती सभागृहात दिली.
राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे गोव्याचे पर्यटन क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. विमाने आणि हॉटेल्स गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी जवळजवळ भरत आहेत. गोव्यातील लोक ही वाढ पाहत आहेत, असे खंवटे म्हणाले. राज्याने कोविडनंतर पर्यटन क्षेत्रात मिळविलेल्या उल्लेखनीय प्रगतीचे दर्शन घडवण्यासाठी मंत्री खंवटे यांनी यावेळी महामारीपूर्वीच्या आकडेवारीसह तुलनात्मक विश्लेषण देखील सादर केले. २०१९ मध्ये गोव्यात ७१,२७,२८७देशांतर्गत आणि ९,३७,११३ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली होती, जी एकूण ८०,६४,४०० इतकी होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ९९,४१,२८५ देशांतर्गत आणि ४,६७,९११ आंतरराष्ट्रीय पर्यटकांची नोंद झाली, जी एकूण १,०४,०९,१९६ झाली.
'पेड इन्फ्लुएंसर'कडून बदनामी...
गोव्याची बदनामी करण्याचे काम केले जात आहे. राज्याबाहेरून सोशल मीडियावरून चुकीची माहिती पसरवली जात आहे. काही 'पेड इन्फ्लुएंसर' यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. जे गोव्याविषयी खोट्या बातम्या पोस्ट करत असल्याची टीका मंत्री खंवटे यांनी केली. त्याचवेळी त्यांनी राज्यातील पर्यटकांची संख्या घटत चालली असेल तर पुरावे दाखवा, असे आव्हानही दिले.
सहा महिन्यांत आले ५७,१२, ७५८ पर्यटक
जानेवारी ते जून २०२५ या काळात गोव्यात ५७ लाख १२ हजार ७५८ पर्यटक आले. ज्यामध्ये ३४ लाख ६४ हजार ४९० पर्यटक दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व २२ लाख ४८ हजार २६८ पर्यटक मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आले. यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ३ लाख २५ हजार ८३५ होती. गेल्या सहा महिन्यांतच दाबोळी आणि मोपा विमानतळांवर सातत्याने जास्त पर्यटकांची गर्दी दिसून आली आहे. तर हॉटेलमधील व्याप्ती वर्षभर ७० ते १०० टक्के असल्याचे खंवटेंनी सांगितले.