गोव्यात आता बारमाही पर्यटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 13:04 IST2018-07-16T13:02:59+5:302018-07-16T13:04:36+5:30
जीटीडीसीचे ट्रेकिंग आणि पावसाळी पर्यटनासाठी वेगवेगळे उपक्रम

गोव्यात आता बारमाही पर्यटन
पणजी : गोव्यात आता बारमाही पर्यटन सुरू करण्यात आले असून ऋतूंचा कोणताही अडसर राहिलेला नाही. जीटीडीसीनेही पावसाळी पर्यटनासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु केले आहेत व त्याचाच एक भाग म्हणून 22 जुलैला सत्तरी तालुक्यातील शिवलिंग धबधब्यावर पदभ्रमणाचे आयोजने केले आहे. गेल्या वर्षी हॉटेल्स डॉट कॉम या आरक्षण संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणात पावसाळी पर्यटनासाठी सर्वाधिक पसंती गोव्याला दिसून आली. आघाडीच्या दहा पावसाळी पर्यटनस्थळांमध्ये कांदोळी, कळंगुट, हडफडे व बागा किना-यांचा समावेश होता.
पावसाळी पर्यटनाला गती मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना पर्यटनमंत्री बाबू आजागंवकर म्हणाले की, ‘पर्यटकांना सर्व ऋतूंची मजा अनुभवायची असते त्यामुळे ते गोव्यात येतात. राज्यासाठी हे लाभदायकच आहे. मान्सूनमध्ये येथील आल्हाददायक वातावरण, दाट हिरवळ अनेकांना भूरळ घालत असते. म्हादई वॉटर राफ्टिंग, पदभ्रमण यासारखे साहसी उपक्रम आम्ही राबवत असतो.’
पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार निलेश काब्राल म्हणाले की, ‘गोव्यात पावसाची मजा औरच असते. येथील नैसर्गिक सौंदर्याला पर्यटन सुविधांची जोड आहे. तरुण, उत्साही देशी पर्यटक मुद्दाम पावसात गोव्यात सहली काढतात. त्यामुळे आता येथील पर्यटनासाठी ‘आॅफ सिझन’चा प्रश्नच राहिलेला नाही.’
दरम्यान, येत्या रविवारी आयोजित केलेल्या पदभ्रमणात ४ किलोमिटर अंतर जंगलातून, द-या-खो-यातून पार करावे लागणार असून ते धाडसी ठरणार आहे. नदी पार करावी लागेल तसेच दोन धबधब्यांचे विहंगम दृश्य टिपता येईल. म्हापसा व मडगांव येथून सकाळी ७.३0 वाजता आणि राजधानी पणजी शहरातून सकाळी ८.३0 वाजता वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. जुने गोवे, बाणस्तारी व साखळी येथेही बस पकडता येईल