लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को:विमानसेवेत देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'इंडिगो'ची सेवा शुक्रवारी, सलग चौथ्या दिवशीही कोलमडली. राज्यातील दाबोळी आणि मोपा या दोन्ही विमानतळावरून सुटणारी ५० उड्डाणे रद्द करावी लागली. दिवसभरात इंडिगोची मोपावरून २ तर दाबोळीवरून ७ उड्डाणे झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांना याचा फटका बसल्याने शेकडो प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. अनेकांना इतर कंपन्यांकडून आयत्या वेळी महागड्या दराने तिकिटे घेऊन प्रवास करावा लागला.
दाबोळी विमानतळावरून शुक्रवारी देशभरात जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या ३८ प्रवासी विमानांपैकी ३१ विमाने रद्द करण्यात आली. या विमानतळावरून कसेबसे ७ विमानांनी दिवसभरात उड्डाण केले असे सूत्रांनी सांगितले. मोपा विमानतळावरून शुक्रवारी इंडिगोची २१ उड्डाणे होती. यापैकी १९ उड्डाणे रद्द करावी लागली. तर २ विमानांनी उड्डाण केले.
दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी १२ ते रात्री ११.५९ पर्यंत येथून ३८ इंडिगो एअरलाईन्सची विमाने प्रवाशांना घेऊन जाणार होती. त्यापैकी ३१ विमाने रद्द झाली असून ७ विमाने प्रवाशांना घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली.
रद्द झालेल्या विमानांमध्ये मुंबई, दिल्ली, हैदराबाद आदी ठिकाणच्या विमानांचा समावेश आहे. इंडिगोच्या फ्लाइट रद्दचा फटका बसल्याची प्रतिक्रिया काही प्रवाशांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, गुरुवारीही दाबोळी विमानतळावरून इंडिगोची ११ विमाने रद्द झाली होती.
गोवा- मुंबई प्रवास; ४.२० लाख तिकीट
इंडिगोच्या घोळाचा मोठा फटका गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री निया शर्मा यांना बसला. राहुल वैद्य यांनी गोवा ते मुंबई असे विमानाचे तिकीट बुक केले होते. मात्र, त्यांचे विमान रद्द झाल्याने आणि त्यांना तातडीने मुंबईला यायचे असल्यामुळे त्यांनी एअर इंडिया कंपनीचे तिकीट खरेदी केले. या तिकीटाकरिता त्यांना तब्बल ४ लाख २० हजार रुपये मोजावे लागले. अभिनेत्री निया शर्मा हिला देखील दिल्लीच्या प्रवासासाठी ५४ हजार रुपये मोजावे लागल्याचे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
Web Summary : Indigo faced severe disruptions with 50 flights cancelled from Goa airports. Passengers faced immense inconvenience, with Goa-Mumbai tickets skyrocketing to ₹4.2 lakhs due to last-minute bookings. Celebrities like Rahul Vaidya and Nia Sharma were among those affected by the flight cancellations.
Web Summary : गोवा हवाई अड्डों से इंडिगो की 50 उड़ानें रद्द होने से भारी व्यवधान। यात्रियों को भारी असुविधा हुई, गोवा-मुंबई के टिकट तत्काल बुकिंग के कारण ₹4.2 लाख तक बढ़ गए। राहुल वैद्य और निया शर्मा जैसे सितारे भी प्रभावित हुए।