'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 13:04 IST2018-02-10T13:03:48+5:302018-02-10T13:04:16+5:30
गोव्यात येणा-या भारतीय पर्यटकांमध्ये गलिच्छ लोकांची संख्या जास्त आहे असं नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई बोलले आहेत

'उत्तर भारतीय पर्यटकांना गोव्यात हरियाणा करायचा आहे'
पणजी : गोवा राज्य एकाबाजूने लाखो पर्यटकांनी गोव्यात यावे म्हणून आवाहन करत पर्यटनाच्या जाहिरातीवर प्रचंड खर्च करत आहे. मात्र गोव्याचे मंत्री विजय सरदेसाई यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यात उत्तर भारतीय पर्यटक नवा हरियाणा तयार करू पाहत आहेत, अशा शब्दांत नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर भारतीय पर्यटकांप्रती असलेली नकारात्मक भावना व्यक्त केली आहे.
गोव्यात ज्यादा पैसा खर्च करू शकतील असे श्रीमंत पर्यटक यायला हवेत अशी भावना अनेक लोकप्रतिनिधी तसेच टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनाही व्यक्त करत असते. मात्र गरीब व उत्तर भारतीय पर्यटक नको अशी भूमिका कुणी मंत्री घेत नसतात. प्रथमच मंत्री सरदेसाई यांनी मात्र उत्तर भारतीय पर्यटकांना अप्रत्यक्षरित्या आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. पृथ्वीच्या तळातील मळ गोव्यात येत असतो असेही विधान मंत्री सरदेसाई यांनी करून काही विशिष्ट अशा गटातील पर्यटकांकडे अंगुलीनिर्देश केला आहे. मंत्री सरदेसाई यांची ही भूमिका देशी पर्यटकांमध्ये मोठय़ा चर्चेचा विषय बनू शकते.
सोळा लाख लोकसंख्येच्या गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. पर्यटकांचे हे प्रमाण वाढायला हवे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना वाटते. नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपा येथे उभा राहिल्यानंतर पर्यटकांचे प्रमाण खूपच वाढेल असा विश्वास सरकारकडून वारंवार व्यक्त केला जात आहे. येत्या पाच ते सहा वर्षात गोव्याची वार्षिक पर्यटक संख्या एक कोटींर्पयत पोहचेल असेही यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मंत्री सरदेसाई यांनी मात्र बिझनेस फेस्टमध्ये बोलताना उत्तर भारतीय पर्यटक जास्त संख्येने गोव्यात नको, असा संदेश दिला आहे. रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर किंवा मोकळी जागा मिळेल तिथे उघडय़ावर स्वयंपाक करणो, कुठेही मग उरलेले अन्न किंवा अन्य खाद्य पदार्थ फेकून देणे, कचरा फेकून देणे, बेशिस्त वागणे अशा कारणास्तव कदाचित मंत्री सरदेसाई हे उत्तर भारतीय पर्यटकांना दोष देत असतील असे मानले जात आहे. मात्र समाजाच्या कोणत्याही थरातील भारतीय आणि विदेशी पर्यटकालाही कुठेही फिरण्याचा अधिकार असल्याने केवळ उत्तर भारतीयच पर्यटकांना निवडून काढून दोष देणे हे गोव्याविषयी चुकीचा संदेश पाठविणारे ठरू शकते, अशी चर्चा गोव्यात सुरू झाली आहे. गोव्यात उत्तर भारतीय पर्यटक हरियाणा तयार करू पाहत आहे असेही मंत्री सरदेसाई यांनी म्हटल्याने हा विषय वादाचाही ठरू शकतो.