no project of doubling railway tracks in goa if governments don't want it says General manager of south west railway | 'सरकारला नको असल्यास गोव्यात रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प करणार नाही'
'सरकारला नको असल्यास गोव्यात रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प करणार नाही'

वास्को: केंद्र अथवा गोवा सरकारने गोव्यात रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प नको असल्याचे आम्हाला कळविल्यास आम्ही हा प्रकल्प येथे करणार नाही. दुसऱ्या राज्यात रेल्वे विस्तारीकरणासाठी आम्हाला आग्रह करण्यात येत असून गोव्याला दुपदरीकरण प्रकल्प नको असल्यास आम्ही कोणावरच दादागिरी करणार नाही. गोव्यात मागील वर्षात रस्त्याचे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यावेळी कोणीच विरोध केलेला नव्हता. त्यामुळे रेल्वे विस्तारीकरणासाठी करण्यात येणारा विरोध ‘रस्ता लॉबी’ मुळे होत असावा अशी आश्चर्यजनक प्रतिक्रिया नैऋत्व रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांच्यासमोर व्यक्त केली.

नैऋत्व रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग रविवारी (दि.१९) गोव्यातील विविध रेल्वे स्थानकाच्या वार्षिक पाहणीच्या दौऱ्यावर आले होते. रविवारी संध्याकाळी ते वास्को रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर त्यांनी येथे विविध प्रकारची पाहणी केली. तसेच वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर ‘जोशी चौक’ मध्ये ‘फ्लॅग मास्ट पोल’ उभारण्यात आल्यानंतर याच्यावर रविवारी राष्ट्रध्वज चढवण्यात आल्यानंतर याचे अजयकुमार यांच्याहस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले. गोव्यात रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणासाठी सध्या विविध प्रकारची पावले उचलण्यात येत असून या प्रकल्पाला मागच्या काही वर्षापासून कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना तसेच कुठ्ठाळी भागातील विविध गावातील नागरिकांनी सतत विरोध दर्शविला आहे.

नैऋत्व रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग रविवारी संध्याकाळी वास्को स्थानकावर येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कुठ्ठाळी मतदारसंघातील काही नागरिकांनी रेल्वे परिसरात जमून रेल्वे रुळाच्या दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध दर्शविला. तसेच कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाना यांनी सरव्यवस्थापक सिंग यांची भेट घेऊन कुठ्ठाळी मतदारसंघातील विविध गावातील नागरिकांचा याप्रकल्पाला विरोध असल्याचे सांगितले. सदर प्रकल्प यागावातून गेल्यास अनेकांची घरे जमीनदोस्त होणार असून यात अनेक घरे ५०० वर्षाहून जुनी असल्याचे साल्ढाना म्हणाल्या. दुपदरीकरण प्रकल्प आल्यास या गावातील नागरिकांना ध्वनी प्रदूषण तसेच अन्य विविध समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगून यामुळेच या प्रकल्पाला आमचा सर्वांचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. 

आमदार साल्ढाना यांच्याशी बोलताना सरव्यवस्थापक सिंग यांनी गोव्यात रेल्वे रुळ दुपदरीकरण प्रकल्प करण्यासाठी आम्हाला केंद्र तसेच राज्य सरकारने सांगितलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. हा प्रकल्प आम्हाला नको असे राज्य सरकारने सांगितल्यास आम्ही नक्कीच सदर प्रकल्प येथे आणणार नसल्याचे ते म्हणाले. भारतातील विविध राज्यात रेल्वे रुळांच्या विस्तारीकरणाचे प्रकल्प यापूर्वी आलेले असून यासाठी शेकडो घरांना जमीनदोस्त करण्यात आलेले असल्याचे सिंग यांनी साल्ढाना यांना सांगितले. दुपदरीकरण प्रकल्पासाठी जर घरे जात असली तर त्या घरमालकांची नुकसान भरपाई देण्यात येते असे ते म्हणाले. देशाचा विकास करायचा असल्यास भावनिक होऊन काहीच फायदा नसून, भावनिक होणे अर्थात कमजोर बनणे असे सिंग यांनी या चर्चेच्या वेळी साल्ढाना यांना सांगितले.

गोव्यात मागच्या काही वर्षात रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्यात आलेले असून तेव्हा कोणीच याला विरोध का केला नाही असा सवाल जेव्हा सिंग यांनी उपस्थित केला त्यावेळी रस्त्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाबाबतही नागरिकांनी बरीच नाराजी व्यक्त केल्याचे साल्ढाना यांनी सांगितले. गोव्यात रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणाला विरोध करण्यामागे ‘रस्ता लॉबी’ चा हात असावा अशी आश्चर्यजनक प्रतिक्रिया सिंग यांनी याप्रसंगी व्यक्त केली. गोव्याला जर रुळांच्या दुपदरीकरणाचा प्रकल्प नको असल्यास आम्ही माघार घेण्यास पूर्णपणे तयार असून या प्रकल्पासाठी आम्ही कोणावरच दादागिरी करणार नसल्याचे सिंग यांनी सांगून गोवा अथवा केंद्र सरकारने याबाबतचे आदेश द्यावे असे ते म्हणाले. जर सरकारने याबाबतचे आदेश दिल्यास याप्रकल्पावर खर्च करण्यात येणारे पैसे दुसऱ्या राज्यात खर्च करून रेल्वे सेवेचा तेथे विकास करण्यात येणार असून दुसऱ्या राज्यात रेल्वे सुविधेत वाढ करण्यासाठी मागणीही असल्याचे सिंग शेवटी म्हणाले. 

‘तुम्ही पोर्तुगालच्या’ अशा करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे आमदार एलिना साल्ढाना चिडल्या
तुम्ही पोर्तुगीज येथे आल्यानंतर येथे असलेली अनेक घरे यापूर्वी जमिनदोस्त केली असल्याची प्रतिक्रिया नैऋत्व रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी आमदार एलिना साल्ढाना यांच्याशी बोलताना व्यक्त केल्याने आमदार साल्ढाना यामुळे बऱ्याच चिडल्याचे दिसून आले. मी पोर्तुगाली नसून मी एक भारतीय तसेच गोमंतकीय नागरिक असल्याचे आमदार साल्ढाना यांनी सांगून तुम्ही जे वक्तव्य केले आहे ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे सिंग यांना सांगितले. मी इतिहासाचे बोलत होतो असे सिंग यांनी नंतर एलिना साल्ढाना यांना सांगून बोललेले माझे शब्द मी मागे घेत असल्याचे सर्वांच्या समोर नंतर सांगितले. दक्षिण पच्छिम रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी केलेले हे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे असून याच्याविरुद्ध नक्कीच आपण उचित पावले उचलणार असे साल्ढाना यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. काही लोक गोवेकरांना पोर्तुगालचे असल्याचे समजत असून त्यांचा हा विचार एकदम चुकीचा आहे. याच चुकीच्या विचारामुळे अनेक वेळा गोवेकरावर विविध वेळा अन्याय होतो असे साल्ढाना यांनी त्यांच्याशी चर्चा करताना सांगितले.

Web Title: no project of doubling railway tracks in goa if governments don't want it says General manager of south west railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.