सुलेमानचा सुगावा लागेना; पोलिसांच्या हाती लागण्याच्या आशा मावळल्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2024 14:04 IST2024-12-19T14:03:28+5:302024-12-19T14:04:33+5:30

गुन्हे शाखेच्या कोठडीमध्ये बंद असलेल्या सुलेमानची आयआरबीच्या पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने मध्यरात्री सुटका करून त्याला आपल्या दुचाकीवरून हुबळीत पोहोचविले.

no clue found about sulaiman hopes of being caught by the police are fading | सुलेमानचा सुगावा लागेना; पोलिसांच्या हाती लागण्याच्या आशा मावळल्यात जमा

सुलेमानचा सुगावा लागेना; पोलिसांच्या हाती लागण्याच्या आशा मावळल्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : क्राइम ब्रचच्या कोठडीतून पसार झालेला अट्टल गुन्हेगार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान आता पोलिसांच्या हाती लागण्याच्या आशा मावळल्याचे संकेत मिळत आहेत. कारण, जो कॉन्स्टेबल अमित नाईक सुलेमानला घेऊन पळाला होता त्याच्याकडून माहिती काढण्यास पोलिसांना अपयश आले असून त्याला आता न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

गुन्हे शाखेच्या कोठडीमध्ये बंद असलेल्या सुलेमानची आयआरबीच्या पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने मध्यरात्री सुटका करून त्याला आपल्या दुचाकीवरून हुबळीत पोहोचविले. त्यानंतर अमित पोलिसांना शरण आला असला तरी सुलेमान मिळालेला नाही. तसेच तो मिळण्याच्या आशाही मावळत चालल्या आहेत. सुलेमान हा कर्नाटकातच लपलेला असून त्याला लवकरच पकडले जाईल, असे पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी म्हटले होते. परंतु खरोखरच सुलेमान कर्नाटकात आहे की नाही हे कळण्यासाठी गोवा पोलिसांना कोणताही धागा मिळोला नाही. कारण सुलेमान कर्नाटकात असता तर पोलिस पथक हैदराबादला पाठविले नसते.

दरम्यान, सुलेमानच्या व्हायरल व्हिडीओमुळे या प्रकरणातला वेगळेच वळण मिळाले आहे. त्याने काही पोलिस अधिकाऱ्यांची आणि राजकारण्यांचीही नावे या प्रकरणात घेतली आहेत. आपण पळालो नसून आपल्याला पळण्यास भाग पाडले आहे, असे सुलेमान याने या व्हिडीओत म्हटले आहे.

डोकेदुखी वाढली 

सध्या बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईककडून कोठडीतील तपासावेळी आवश्यक माहिती काढून घेण्यास पोलिसांना अपयश आले आहे. त्याचबरोबर सुलेमान अमितला किती माहिती सांगणार, या बद्दलही शंकाच आहे. सोमवारी अमितची जुने गोवा पोलिसांच्या कोठडीतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्यामुळे पोलिसांनी हातपाय गाळल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

अमित नाईकची वैद्यकीय तपासणी 

सुलेमान प्रकरणातील बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईक याची बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी करण्यात आली. उत्तर गोव्याच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. तासभर त्याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. तपासणीनंतर त्याची न्यायालयिन कोठडीत रवानगी करण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी अमितला प्रश्न विचारले पण एकाही प्रश्नाचे उत्तर न देता तो पोलिसांच्या वाहनात जाऊन बसला.
 

Web Title: no clue found about sulaiman hopes of being caught by the police are fading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.