कोमुनिदाद, आल्वारा जागेतील घरांसाठी लवकरच नवा कायदा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 07:26 IST2025-05-13T07:24:54+5:302025-05-13T07:26:01+5:30

डिचोली येथे भव्य प्रशासकीय इमारतीची पायाभरणी

new law soon for houses in comunidade alwar area said cm pramod sawant | कोमुनिदाद, आल्वारा जागेतील घरांसाठी लवकरच नवा कायदा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

कोमुनिदाद, आल्वारा जागेतील घरांसाठी लवकरच नवा कायदा!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: राज्य सरकार जलदगतीने प्रशासन जनतेच्या दारापर्यंत नेत असताना अनेक नव्या सुधारणा करण्यात येत आहेत. २१२ हून अधिक सेवा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. कुळ-मुडकारांचे खटलेही तत्काळ निकालात काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आता राज्यातील कोमुनिदाद, अल्वारा जमिनीत असलेली घरे कायदेशीर करण्यासाठी सरकार विशेष कायदा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.

डिचोली येथे ६० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत, तसेच कला भवन प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार डॉक्टर चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, जिल्हाधिकारी यशस्विनी बी, गोवा साधन सुविधा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हरीश हडकोणकर, उपजिल्हाधिकारी नेहाल तळावणेकर, जिल्हा पंचायत अध्यक्ष शंकर चोडणकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

नव्या प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाच्या सुविधा प्राप्त होताना एकाच छताखाली सर्व सरकारी कार्यालये येणार आहेत, तसेच डिचोलीवासीयांची कला भवनची मागणी पूर्ण करताना ६०० प्रेक्षक क्षमतेचे सुसज्ज भवन याच इमारतीत साकारणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वाढते शहरीकरण व इतर सुविधा वाढत असताना या ठिकाणी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प गरजेचा असून, आगामी काळात त्यासाठीही नियोजन करण्याची गरज आहे. नियोजित प्रशासकीय इमारत व इतर योजना आखताना डिचोलीच्या मास्टर प्लानची निर्मिती करून विकासाला चालणा देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी अनेक वर्षांची मागणी साकारत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तर आमदार प्रेमेंद्र शेट यांनीही कला भवनची मागणी पूर्णत्वास येत असल्याबद्दल आभार व्यक्त केले, तसेच नवीन संकुल व त्यात एका छताखाली येणाऱ्या सर्व प्रशासकीय कार्यालयांमुळे लोकांची चांगली सुविधा मिळणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी यशस्विनी बी. यांनी स्वागत केले. उपजिल्हाधिकारी तळवणकर यांनी आभार मानले.

प्रशासन जलद करण्यावर सरकार भर देत आहे. आपल्या कारकीर्दीत धारबांदोडा तालुक्याची निर्मिती झाली. त्या ठिकाणी आम्ही दर्जेदार प्रशासकीय इमारत उभारली. त्याच पद्धतीची इमारत आता डिचोलीत उभारली जात आहे. तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालये भाडेपट्टीवर असून, या इमारतीनंतर सर्व कार्यालये सरकारच्या जागेत स्थलांतरित होतील. यावेळी आमदार चंद्रकांत शेट्ये व आमदार प्रेमेंद्र शेट यांनी अनेक वर्षांची मागणी साकारत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

जवानांना आदरांजली

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांबरोबर पाकिस्तानची कोंडी केली. घरात घुसून दहशवाद्यांसह त्यांचे तळही भारतीय सैन्य दलाने उद्ध्वस्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्याने केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे, तसेच या कारवाईवेळी काही भारतीय सैनिक शहीद झाले त्या जवानांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी आदरांजली वाहिली.

वकील आणू नका

मामलेदार कार्यालयात मुंडकरांचे खटले घेऊन येताना तिथे वकील आणू नये. अधिकाऱ्यांनीच हा विषय सोडवावा, अशा प्रकारची व्यवस्था करणार. आगामी २५ ते ५० वर्षांचे नियोजन करण्याचा दूरदृष्टिकोन ठेवून आमचे सरकार काम करीत आहे. साळ धुमासे येथील जलप्रकल्पाचे नियोजनही पुढील पन्नास वर्षांची आखणी करून करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 

Web Title: new law soon for houses in comunidade alwar area said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.