आरजीची नवी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 10:26 IST2023-05-30T10:26:19+5:302023-05-30T10:26:38+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीने जवळजवळ दहा टक्के मते प्राप्त केली होती.

आरजीची नवी घोषणा
रिव्होल्यूशनरी गोवन्स हा पक्ष आपली स्वत:ची वेगळी वाट चालू पाहत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यातील दोन्ही जागा आरजी लढेल, असे मनोज परब यांनी परवाच जाहीर केले. आरजी लोकसभा निवडणुकीवेळी कुणासोबत युती करणार नाही हे स्पष्ट झाले. आरजीचा दावा आहे की त्या पक्षाने गोमंतकीयांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे आरजी स्वतंत्रपणे २०२४ च्या निवडणुकीवेळी आपले उमेदवार उत्तर व दक्षिण गोवा मतदारसंघात उभे करणार आहे. आरजीचा विश्वास कोणत्याच स्थानिक किंवा राष्ट्रीय पक्षावर नाही. त्यामुळे युती करण्याचा प्रश्नच येत नाही. आरजीने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले तर काँग्रेसला की भाजपला फटका बसेल हे सांगण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही.
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीने जवळजवळ दहा टक्के मते प्राप्त केली होती. नेमकेपणाने सांगायचे तर आरजीला ९३ हजार २५५ म्हणजे ९.४५ टक्के मते मिळाली. आम आदमी पक्षाला गोव्यात ६४ हजार ६३५ म्हणजे ६.८ टक्के मते मिळवता आली. तृणमूल काँग्रेसला ४९ हजार ४८० (५.२ टक्के), म.गो. पक्षाला ७२ हजार २६९ (७.६ टक्के) आणि गोवा फॉरवर्ड पक्षाला फक्त १७ हजार ४७७ म्हणजे १.८ टक्के एवढी मते लोकांनी दिली. भाजपने ३३ टक्के, तर कॉंग्रेसने २३.५ टक्के मतांपर्यंत मजल मारली होती. आरजी, आप, तृणमूल या तीन पक्षांची मते एकत्र केली तर ती २१ टक्के होतात.
काँग्रेसला सतत वाटत आले आहे की, तृणमूल किंवा आरजीने प्राप्त केलेली मते ही आपली हक्काची मते आहेत. वास्तविक तसे समजणे हे अर्धसत्य आहे. आता काँग्रेसची कोणतीच मते ही हक्काची राहिलेली नाहीत. ख्रिस्ती धर्मीयांनी काँग्रेसची साथ २००० सालापासून सोडण्यास आरंभ केला. काँग्रेसच्या सासष्टीतील नेत्यांनी चर्च संस्थेचादेखील अपेक्षाभंग केल्याने ख्रिस्ती मतदार काँग्रेसपासून दूर जाऊ लागला. आता तर भाजपमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त ख्रिस्ती धर्मीय आमदार असतात. या आमदारांसोबतही ख्रिस्ती मतदार आहेतच. ख्रिस्ती धर्मीय मतदारांची मते आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजी, कॉंग्रेस व भाजप अशा सर्वच पक्षांना कमी-अधिक प्रमाणात मिळतात. काँग्रेसला अजूनही त्यापैकी जास्त मते मिळतात. मात्र, हिंदू मते ही कॉंग्रेस व भाजपमध्ये जास्त विभागून जात आहेत. अन्य छोट्या पक्षांना ही मते जास्त प्रमाणात अजून मिळवता आलेली नाहीत.
तरीही गेल्या विधानसभा निवडणुकीत आरजीने हिंदू मतदारसंघांमध्येदेखील बऱ्यापैकी मते प्राप्त करून दाखवली आहेत. सत्तरी तालुक्यात देखील आरजीला मते मिळतात व तिसवाडी आणि सासष्टीतदेखील मते मिळतात. यामुळेच यापुढे लोकसभा निवडणूक स्वबळावर आरजी पक्ष लढू पाहतोय, भाजपविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी एकच सर्वमान्य उमेदवार उभा करावा असा प्रयत्न कदाचित काँग्रेस पक्ष करून पाहील. मात्र, तसे कधीच शक्य होणार नाही. कॉंग्रेसमध्येच उत्तर गोव्यात व दक्षिणेत प्रत्येकी तीन इच्छुक उमेदवार आहेत. ज्यांना तिकीट मिळत नाही, ते बंड करत असतात. लोकसभा निवडणुकीवेळी आरजीला स्वतःची शक्ती दाखवावी लागेल. आरजी व आम आदमी पक्षाचे कसेच पटत नाही. तसेच आरजी व काँग्रेसचेही संबंध कायम ताणलेले असतात.
आरजीने गेल्या विधानसभा निवडणुकीत आपले नुकसान केले असे काँग्रेसला वाटते. मात्र, आरजीचा दावा असा आहे, की आरजीमुळे भाजपचेही उमेदवार काही मतदारसंघात पराभूत झाले आहेत. आरजीला भाजपनेच पुढे काढले होते असा दावा मुळीच करता येत नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आरजीने प्रभावी कामगिरी केली, म्हणून आता लोकसभा निवडणुकीवेळीही तशीच प्रभावी कामगिरी करता येईल असे सध्या म्हणता येत नाही. आरजीला लोकसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात मते प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. आरजीमध्ये फूट पाडण्याचाही प्रयत्न काहीजण करत आहेत. मनोज परब यांनीदेखील त्या अर्थाचे विधान अलीकडेच केले होते. आरजीचे उमेदवार जर लोकसभा निवडणुकीवेळी जास्त प्रमाणात मते प्राप्त करण्यात यशस्वी ठरले, तरच गोमंतकीयांमध्ये हा पक्ष आता रुजला असे म्हणता येईल.