CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 PM2021-05-29T16:16:54+5:302021-05-29T16:18:43+5:30

गेल्या सहा दिवसांत सुमारे दोनशे कोविडग्रस्तांचा जीव गेला पण त्याच काळात एकूण ११ हजार ३०५ कोविड रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

nearly 11 305 patients recover from corona in last six days in goa | CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात

CoronaVirus: गोव्यात सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांची कोविडवर मात

Next

पणजी: गेल्या सहा दिवसांत सुमारे दोनशे कोविडग्रस्तांचा जीव गेला पण त्याच काळात एकूण ११ हजार ३०५ कोविड रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. ते ठीक झाले. ८६५ रुग्णांना सहा दिवसांत इस्पितळातून डिस्चार्ज मिळाला.

कोविडची दुसरी लाट ओसरू लागली आहे. कोविड रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र ही संख्या एकदमही कमी होताना दिसत नाही. फार वेगाने कोविडग्रस्तांची संख्या घटली असे झालेले नाही. सरकारने घरी विलगीकरणासाठी असलेला कालावधी सतरा दिवसांवरून दहा दिवसांवर आणला. मात्र लोकांनी बाहेर फिरताना मास्क वापरणे, सोशल डिस्टनसींग पाळणे व शक्य तो घरीच राहणे अशा प्रकारची उपाययोजना कायम ठेवणे गरजेचे 
आहे.

गेल्या सहा दिवसांत चाळीसहून कमी वयाचे अनेकजण दगावले. अन्य कसलीच व्याधी नसताना केवळ कोविडने घाला घातला व त्यामुळे जीव गमवावा लागला असे अनेक तरुणांबाबत झाले आहे. विविध वयोगटातील अजुनही ३० ते ४० रुग्ण मरण पावत आहेत. बहुतांश रुग्ण गोमेको इस्पितळात मरण पावतात, कारण तिथे गंभीर अशा कोविड रुग्णांनाच उपचारांसाठी आणले जाते. चाळीशी अजुनही न गाठलेले किंवा नुकतीच चाळीशी ओलांडलेले असे रोज सात किंवा आठ रुग्ण कोविडचे बळी ठरत आहेत. स्थिती एवढी गंभीर आहे. कळंगुटच्या भागात तर वयाची पंचवीशी देखील पार न केलेले दोन रुग्ण दगावले. सासष्टी, पेडणे, डिचोली, फोंडा, तिसवाडी या तालुक्यांतीलही कमी वयाचे काही रुग्ण कोविडचे बळी ठरले आहेत.

गेल्या सहा दिवसांत ११ हजार ३०५ रुग्णांनी कोविडवर मात केली. यापैकी बहुतांशजण हे घरी विलगीकरणामध्ये राहून ठीक झाले तर सुमारे ८६५ रुग्ण इस्पितळात उपचार घेऊन यशस्वीपणे घरी परतले. रोज दीड ते दोन हजार रुग्ण ठीक होत आहेत. मात्र त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे लागतात. काही रुग्ण कोविडची लक्षणे दिसताच लगेच इस्पितळात दाखल होतात व त्यामुळे ते ठीक होतात असेही आढळून आले. काहीजण बेपर्वा पद्धतीने घरीच राहतात व मग शेवटच्या टप्प्यावर श्वास कोंडू लागला की, मग इस्पितळ गाठतात. काही रुग्णांना मृतावस्थेतच प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा इस्पितळात आणले जाते.

तारीखनिहाय ठिक झालेल्या रुग्णांची संख्या व इस्पितळातून डिस्चार्ज मिळालेले रुग्ण - 

तारीख - ठीक झाले - डिस्चार्ज मिळालेले रुग्ण

२३ मे - २५४५ - १४५
२४ मे - २३६२ - १४७
२५ मे - २०८२ - १४४
२६ मे - १३६३ - १३४
२७ मे - १५५७ - १४१
२८ मे - १३९६ - १५४
 

Web Title: nearly 11 305 patients recover from corona in last six days in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.