राष्ट्रवादीमध्ये बंड
By Admin | Updated: April 12, 2015 01:12 IST2015-04-12T01:12:47+5:302015-04-12T01:12:59+5:30
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्षपदाच्या विषयावरून उभी फूट पडली आहे. अॅड. सुहास वळवईकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे

राष्ट्रवादीमध्ये बंड
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्षपदाच्या विषयावरून उभी फूट पडली आहे. अॅड. सुहास वळवईकर यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे बहुतांश पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले असून त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याची तयारी केली आहे. येत्या दोन दिवसांत राजीनामे दिले जातील, अशी माहिती मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत पुढे आलेल्या एखाद्या पदाधिकाऱ्यास किंवा कार्यकर्त्यास प्रदेशाध्यक्षपद द्यायला हवे होते, असे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटते. अविनाश भोसले व अनिल जोलापुरे वगळता अन्य बहुतेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एक बैठक शुक्रवारी रात्री पार पडली.
जुझे फिलिप डिसोझा, ट्रोजन डिमेलो, देवानंद नाईक, सलिम सय्यद आदी अनेकांनी बैठकीत भाग घेतला. वळवईकर यांची नियुक्ती आम्हाला मान्य नाही व त्यामुळे आम्ही पदाचे राजीनामे देणेच योग्य आहे,
असा सूर काही पदाधिकाऱ्यांनी बैठकीत लावल्याचे सूत्रांनी
सांगितले.
येत्या मंगळवारी वळवईकर हे प्रदेशाध्यक्ष म्हणून पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. तत्पूर्वी जुझे फिलिप डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे बहुतेक पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामे देऊन मोकळे होतील, असे सूत्रांनी सांगितले.
माजी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. ते पक्षाचे सदस्य या नात्याने पक्षात आहेत.
(खास प्रतिनिधी)