नॅशने चित्रपटांतून उचलले दहशतवाद्यांचे संवाद

By Admin | Updated: January 24, 2015 01:53 IST2015-01-24T01:51:51+5:302015-01-24T01:53:22+5:30

जामीन नाकारला : २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी; न्यायालयाने व्यक्त केली सखोल तपासाची गरज

Nash's terrorists' dialogue took place in movies | नॅशने चित्रपटांतून उचलले दहशतवाद्यांचे संवाद

नॅशने चित्रपटांतून उचलले दहशतवाद्यांचे संवाद

मडगाव : लहानपणापासून देशभक्तीचे चित्रपट पाहाण्याची हौस असलेल्या नॅश कुतिन्होने दिल्ली पोलिसांना पाठविलेल्या अतिरेकी हल्ल्याच्या संदेशातील संवाद त्याने ‘टँगो चार्ली’, ‘हॉलिडे’, ‘बॉर्डर’ तसेच ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटांमधून उतरविले होते. हेच संवाद आता त्याच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. या प्रकरणात पोलिसांना अधिक चौकशी करण्याची गरज लक्षात घेऊन तसेच या प्रकरणी कदाचित खरेच अतिरेक्यांचा हात असण्याची शक्यता गृहीत धरून नॅशने जामिनासाठी केलेला अर्ज मडगावच्या प्रथम वर्ग न्यायाधीश पूजा कवळेकर यांनी शुक्रवारी फेटाळून लावला.
न्यायालयाने नॅशचा पोलीस कोठडीचा रिमांड २६ जानेवारीपर्यंत वाढविला आहे. अतिरेकी संघटनांनी कदाचित नॅशचा वापर केला असावा. त्यामुळे त्याची कसून चौकशी करण्याची गरज कुंकळ्ळी पोलिसांतर्फे साहाय्यक सरकारी वकील शिल्पा नागवेकर यांनी व्यक्त केली. नॅशला मोकळे सोडल्यास अतिरेकी त्याच्याशी संपर्क साधू शकतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या परेडवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. हा निकाल देण्यापूर्वी न्या. कवळेकर यांनी आपल्या कक्षात जाऊन नॅशने दिल्ली पोलिसांना पाठविलेला मोबाईल संदेश स्वत: ऐकला व त्यानंतरच त्यांनी आपला निकाल दिला.
नॅशच्या वतीने बाजू मांडताना अ‍ॅड. आनाक्लेत व्हिएगस यांनी म्हटले की, नॅशला दिल्लीतील परेडमध्ये भाग घेऊन भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पाहण्याची इच्छा होती. मात्र, ऐनवेळी मुलांच्या गटाला वगळून या परेडला मुलींचा गट पाठविण्यात आला. त्यामुळे आलेल्या वैफल्यातून नॅशने हे कृत्य केले. या कृतीमागे कुठलाही गुन्हेगारी स्वरूपाचा कट नव्हता.
व्हिएगस यांच्या दाव्याप्रमाणे, नॅशला लहानपणापासून देशाविषयी व तिरंग्याविषयी प्रेम होते. त्यातूनच तो एनसीसीकडे आकृष्ट झाला. आॅक्टोबर २०१४मध्ये त्याची या परेडसाठी प्राथमिक निवड झाली होती. या परेडची गेले सहा महिने तो आतुरतेने वाट पाहात होता. आपला दावा न्यायालयासमोर मांडण्यासाठी अ‍ॅड. व्हिएगस यांनी नॅशचा लहानपणाचे हातात तिरंगा घेतलेले व सैनिकी पोषाखातील छायाचित्रही न्यायालयासमोर पेश केले.
एनसीसीमध्ये प्रावीण्य मिळविलेला नॅश संगणकामध्येही तरबेज होता. यापूर्वी संगणकासंदर्भातील कित्येक प्रश्नमंजूषा स्पर्धांत त्याने भाग घेतला होता. संगणकात तरबेज असलेल्या नॅशने आपल्याच लॅपटॉपवरून वाहनांचे आवाज आणि गोळ्यांचे आवाज डाउनलोड करून नंतर ते मोबाईलवरून दिल्ली पोलिसांना पाठविले होते. दिल्लीच्या दरियागंज या पोलीस स्थानकाचा नंबर त्याने गुगल सर्चवरून मिळविला, अशी माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, नॅशची ही कृती सौम्यपणे घेता येण्यासारखी नाही, असा दावा साहाय्यक सरकारी वकील नागवेकर यांनी केला. नॅशने खलिज फैजल या कथित अतिरेक्याचे नाव घेतले होते. कदाचित खरेच अतिरेकी त्याने पाहिले असावेत; पण नंतर अतिरेक्यांनी दबाव आणल्यामुळे त्याने आपला जबाब बदलला असावा, ही शक्यता नाकारता येत नाही. मोबाईलवर डाउनलोड झालेला आवाज नॅशचाच आहे का, हेही तपासून पाहण्याची गरज आहे. यासाठी दिल्लीतील आयबी शाखेशी कुंकळ्ळी पोलिसांनी संपर्क साधला आहे. या प्रकरणात तपास करण्यासाठी पोलिसांना नॅशला आणखी काही दिवस पोलीस कोठडीत ठेवायला हवे, असा दावा केला. न्या. कवळेकर यांनी हा दावा उचलून धरताना जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला.
(प्रतिनिधी)

Web Title: Nash's terrorists' dialogue took place in movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.