मयत पोलीस युवतीच्या नावे बोगस फोटो व्हायरल, बदनामी करणा-याचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 20:51 IST2018-02-10T20:50:09+5:302018-02-10T20:51:44+5:30
हणजुणे येथे रेटॉल प्राशन करून आत्महत्त्या केलेल्या अर्शला पार्सेकर या महिला कॉन्स्टेबलची मृत्युनंतरही बदनामी करण्याचे षडयंत्र चालविल्याचे उघडकीस आले आहे.

मयत पोलीस युवतीच्या नावे बोगस फोटो व्हायरल, बदनामी करणा-याचा शोध सुरु
पणजी - हणजुणे येथे रेटॉल प्राशन करून आत्महत्त्या केलेल्या अर्शला पार्सेकर या महिला कॉन्स्टेबलची मृत्युनंतरही बदनामी करण्याचे षडयंत्र चालविल्याचे उघडकीस आले आहे. या युवतीच्या नावाने भलतीच चित्रे व्हायरल करण्यात आली आहेत. व्हायरल करण्यात आलेल्या छायाचित्रात एक युवती आणि युवक नग्न अवस्थेत असल्याचे दिसत आहे.
त्या फोटो बरोबरच हणजुणे येथे महिला कॉन्स्टेबलने केलेल्या आत्महत्त्येच्या वृत्ताचा फोटोही व्हायरल करण्यात आला आहे. म्हणजेच हे पाहणा-याला हीच ती कॉन्स्टेबल वाटावी आणि तो युवक म्हणजे सध्या चर्चेत असलेला उपनिरीक्षक वाटावा यासाठी हे प्रयत्न केल्याचेही स्पष्ट होत आहे. हे फोटो तमीळ मजकूर असलेल्या एका पोर्न वेबसाईटवरून डाउन्लोड केल्याचेही गुगल इमेजसर्जमधून स्पष्ट होत आहे. बोगस फोटो त्या युवतीच्या आत्महत्त्येच्या बातमीबरोबर व्हायरल करून बदनामी करणा-यांचा पोलीस शोध घेत असून या बाबतीत पोलिसांना काही धागेदोरे मिळाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
प्रकरण क्राईम ब्रँचकडे
अर्शला पार्सेकर प्रकरण आता क्राईम ब्रँचकडे सोपविण्यात आले आहे. हे प्रकरण हणजुणे पोलीसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंदविण्यात आले होते. त्यानंतर त्याचा तपासही सुरू करण्यात आला होता. तिच्या आत्महत्त्येसाठी एका उपनिरीक्षकालाही जबाबदार धरले जात आहे. हा उपनिरीक्षकही गायब झाला होता. या प्रकरणातील गुंता वाढल्यामुळे हे प्रकरण हणजुणे पोलिसांकडून क्राईम ब्रंचकडे सोपविण्यात आले.