पणजी कार्निव्हलसाठी महापालिकेची जोरदार तयारी - महापौर विठ्ठल चोपडेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 20:19 IST2019-02-21T20:19:13+5:302019-02-21T20:19:34+5:30
राजधानी शहरात येत्या २ मार्च रोजी होणार असलेल्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी महापालिका जोरदार तयारीला लागली आहे. या मिरवणुकीतून ‘खा, प्या आणि मजा करा’ असा संदेश देत ‘किंग मोमो’ अवतरणार आहे

पणजी कार्निव्हलसाठी महापालिकेची जोरदार तयारी - महापौर विठ्ठल चोपडेकर
पणजी : राजधानी शहरात येत्या २ मार्च रोजी होणार असलेल्या कार्निव्हल मिरवणुकीसाठी महापालिका जोरदार तयारीला लागली आहे. या मिरवणुकीतून ‘खा, प्या आणि मजा करा’ असा संदेश देत ‘किंग मोमो’ अवतरणार आहे आणि त्यानंतर पुढील चार दिवस गोव्यात ‘किंग मोमो’ची राजवट राहणार आहे. राजधानीतील कार्निव्हलनिमित्त महापौर विठ्ठल चोपडेकर यांच्याशी केलेली बातचित.
२ मार्च रोजी होणा-या कार्निव्हल निवडणुकीबद्दल काय सांगाल? असा सवाल केला असता चोपडेकर म्हणाले की, मिरामार ते दोनापॉल काँक्रिट मार्गावर ही मिरवणूक होणार असून शहरातील मेरी इमेक्युलेट चर्चसमोरील चिल्ड्रन्स पार्कमध्ये ‘सांबा स्क्वेअर’मध्ये चार दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे. यंदा प्रथमच महापालिकेच्या काही निवडक प्रभागांमध्ये मळा, रायबंदर अल्तिनो येथे ‘तियात्र’ तसेच संगीताचे कार्यक्रम होतील.
कार्निव्हल मिरवणुकीसाठी एकूण खर्चाचे नियोजन कसे केले आहे? या प्रश्नावर महापौर म्हणाले की, ‘२७ लाख रुपये खर्चाची तरतूद पर्यटन खात्याने केली आहे. यात बक्षिसांच्या रकमेचाही समावेश आहे. परंतु एकूण सुमारे ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आह.े शहरातील बडे बिल्डर्स, तारांकित हॉटेलांचे मालक तसेच मोठ्या आस्थापनांच्या मालकांना पत्रे पाठवली असून त्यांना आर्थिक सहकार्य करण्याची विनंती केली आहे. आम्ही कोणावरही आर्थिक सक्ती केलेली नाही. मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा मंडप उभारुन हॉटेलांना ही जागा काही शुल्क आकारुन उपलब्ध केली जाईल. त्यातूनही महसूल मिळणार आहे.’
३ मार्च रोजी शहरात ‘नोमोझो’, अनेक कार्यक्रमांची रेलचेल
यंदाच्या कार्निव्हलचे आणखी वैशिष्ट्य काय असे विचारले असता चोपडेकर म्हणाले की, ३ मार्च रोजी १८ जून रस्त्यावर ‘नोमोझो’ आयोजित केला जाणार असून दुपारी ३ ते रात्री १0 या वेळेत या रस्त्यावर वाहनांना बंदी असेल. रस्त्यावर गायन स्पर्धा, सायकल स्पर्धा, कराटे तसेच अन्य कार्यक्रमांचे आयोजन असेल. २ मार्च ते ५ मार्च असे चार दिवस शहरात भरगच्च कार्यक्रम होतील.
मिरवणूक काळात वाहतुकीत बदल करणार आहात काय, या प्रश्नावर चोपडेकर म्हणाले की, येत्या सोमवारी वाहतूक पोलिसांकडे तसेच जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाºयांकडे बैठकीचे आयोजन असून त्यावेळी वाहतुकीची रुपरेषा निश्चित होणार आहे. मिरवणूक शहराबाहेरच होणार असल्याने शहरातील वाहतुकीवर तसा काहीच परिणाम होणार नाही. मिरामार सायन्स सेंटर ते दोनापॉल असा मिरवणुकीचा मार्ग असेल.