मृदुला सिन्हा गोव्याच्या राज्यपाल
By Admin | Updated: August 27, 2014 01:31 IST2014-08-27T01:26:33+5:302014-08-27T01:31:32+5:30
पणजी : हिंदी साहित्यविश्वात मोठे योगदान दिलेल्या ७१ वर्षीय लेखिका मृदुला सिन्हा यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली असून त्याबाबतचा आदेश जारी झाला आहे.

मृदुला सिन्हा गोव्याच्या राज्यपाल
पणजी : हिंदी साहित्यविश्वात मोठे योगदान दिलेल्या ७१ वर्षीय लेखिका मृदुला सिन्हा यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली असून त्याबाबतचा आदेश जारी झाला आहे.
भारत वीर वांच्छू यांनी राजीनामा दिल्यापासून गोव्याला स्वतंत्र राज्यपाल मिळाले नव्हते. प्रथम काही दिवसांसाठी मार्गारेट अल्वा यांच्याकडे राज्यपालपदाचा ताबा देण्यात आला होता. सिन्हा या पूर्ण दर्जाच्या राज्यपाल बनल्या आहेत. २७ नोव्हेंबर १९४२ रोजी छाप्रा, मुजफ्फरपूर-बिहार येथे सिन्हा यांचा जन्म झाला. मानसशास्त्र विषयात त्यांनी पीएचडी प्राप्त केली व नंतर बीएडचे शिक्षण घेतले. महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून त्यांनी कारकिर्दीस आरंभ केला होता. नंतर शिक्षकी पेशा सोडून त्यांनी पूर्णवेळ हिंदी साहित्यसेवेचे कार्य सुरू केले. त्यांनी लिहिलेल्या एका चरित्रावर सिनेमाही निघाला आहे.
डॉ. राम कृपाल सिन्हा यांच्याशी मृदुला यांचा विवाह झाला. डॉ. सिन्हा हे बिहार मंत्रिमंडळात मंत्री होते. डॉ. सिन्हा यांच्यानंतर मृदुला याही राजकारणात आल्या व त्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष बनल्या होत्या. त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्याही अध्यक्ष होत्या. आपली राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्याला गोव्यातील लोकांची सेवा करायची आहे. गोव्याला चांगले प्रशासन मिळावे, असे आपल्याला वाटते. आपण नेहमीच अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेत आले आहे, असे सिन्हा म्हणाल्या. (खास प्रतिनिधी)