कदंब महामंडळासाठी आणखी 100 बसगाड्या खरेदी करणार - मनोहर पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 13:26 IST2018-08-02T13:26:21+5:302018-08-02T13:26:26+5:30
गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळासाठी आणखी 100 नव्या बसगाड्या खरेदी केल्या जाणार आहेत.

कदंब महामंडळासाठी आणखी 100 बसगाड्या खरेदी करणार - मनोहर पर्रीकर
पणजी : गोव्यात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या कदंब महामंडळासाठी आणखी 100 नव्या बसगाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत ही माहिती दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात 545 बसगाड्या आहेत एकूणच वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अपघातातील बळींची संख्या 22 टक्क्यांनी कमी झालेली आहे. दहा वर्षांपेक्षा जुन्या बसगाड्या मोडीत काढण्यासाठी सहा लाख रुपयांपर्यंत सबसिडी खासगी बसमालकांना दिली जात आहे. गोव्यात कदंब महामंडळाबरोबरच खासगी बस सेवाही चालते. सुमारे चार हजार खासगी बसगाड्या गोव्यात आहेत. गोवा- मुंबई मार्गावर केवळ दोन कदंब बस आहेत तर खासगी लक्झरी बस गाड्यांची संख्या मोठी आहे.
गोव्याच्या ग्रामीण भागांमध्ये अजूनही कदंबच्या हव्या तेवढ्या फेऱ्या होत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्रासदायक ठरते, असे काही आमदारांनी विधानसभेत निदर्शनास आणले होते. नव्या बसगाड्या खरेदी केल्यानंतर या समस्या दूर होतील ग्रामीण भागातील आवश्यक तेथे या गाड्या घातल्या जातील, असे सांगितले. रात्रीच्या अपघातांमध्ये वाढ झाली असल्याचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी विधानसभेत निदर्शनास आणले. आरटीओ अधिकारी तसेच वाहतूक पोलिसांना रात्री ड्युटी लावावी. कारण रात्रीची नशाबाजी करून वाहने चालवण्याचे प्रकार अधिक घडतात आणि त्यामुळे अपघातही होतात, असे डीसा म्हणाले. आमदार राजेश पाटणेकर यांनी डिचोली बस स्थानकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण पूर्ण करण्याचे काम लवकरात लवकर केले जावे, अशी मागणी केली. कदंब महामंडळात अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्या रखडल्या आहेत त्या विनाविलंब भरल्या जाव्यात अशा मागण्याही करण्यात आल्या.
दरम्यान, मांडवी नदीवरील तिसरा पूल येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिली आहे.या पुलाचे 87 टक्के काम पूर्ण झालेले आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनी हे काम करीत आहे. या पुलासाठी 420 कोटी रुपये कोटी रुपये खर्चाचा प्राथमिक अंदाज असला तरी एकूण खर्च 800 कोटी रुपयांच्यावर जाणार आहे. केंद्र सरकारकडून या पुलासाठी भरीव आर्थिक मदत मिळालेली आहे.