‘मोपा’प्रश्नी समर्थक-विरोधक सक्रिय
By Admin | Updated: January 25, 2015 01:42 IST2015-01-25T01:40:18+5:302015-01-25T01:42:08+5:30
१ फेब्रुवारीला जनसुनावणी : उपस्थितीसाठी जोरदार प्रयत्न; दावे-प्रतिदावे सुरू

‘मोपा’प्रश्नी समर्थक-विरोधक सक्रिय
पेडणे : पेडणे तालुक्यातील होऊ घातलेल्या १३ व्या आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टसंबंधी १ फेब्रुवारी रोजी मोपा पठारावर जी जनसुनावणी होणार आहे त्या सुनावणीला मोठ्या संख्येने समर्थक शेतकरी उपस्थित राहाणार आहेत. त्यासाठी आत्तापासूनच पेडणे तालुक्यातून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणी बैठका घेऊन जनजागृती सुरू झाली आहे.
मोपा विमानतळासाठी पर्यावरणीय परिणाम अभ्यासाच्या दृष्टीने १ फेब्रुवारी रोजी नियोजित मोपा विमानतळ पठारावर जनसुनावणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पठारावर व्यवस्थित वाहने व जनसमुदायास उपस्थित राहावे यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे.
मोपा पठारावर दिवसभर जनसुनावणी चालणार आहे. या सुनावणीच्या वेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन, कृषी संचालक, बांधकाम प्रधान मुख्य अभियंता, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस महानिरीक्षक, हवाई वाहतूक संचालक आदी हजर राहाणार आहेत.
सासष्टी तालुक्यातील काही चार-पाचजण सध्या सायंकाळी मोपात येऊन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना भेटून मोपा विमानतळासाठी विरोध करा म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे. मोपातील या विमानतळामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार, निसर्गनिर्मित झाडे पर्यावरण नष्ट होईल, जलस्रोत साठे आटणार, अशी माहिती देण्याचे काम सध्या जोरदारपणे चालू आहे.
पीपल फॉर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट संघटनेचे निमंत्रक देवेंद्र प्रभुदेसाई व सचिव अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी संयुक्तपणे माहिती देताना मोपा विमानतळासाठी संघटनेतर्फे यापूर्वीच गावागावांत बैठका घेऊन जनजागृती केलेली आहे. आता मोठ्या संख्येने समर्थक हजर राहावेत यासाठी बैठका चालू असल्याचे सांगितले.
भाजपाचे नेते व्यंकटेश घोटगे यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना १ फेब्रुवारी रोजी जी सुनावणी होणार त्या सुनावणीवेळी काही सासष्टी भागातून विरोधक उपस्थिती लावणार आहेत, अशी माहिती मिळालेली आहे; परंतु मोपा समर्थक या जनसुनावणीला मोठ्या संख्येने हजर राहाणार व पेडणे भाजपा मंडळ प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. रस्त्याचे काम युद्धपातळीवर मोपा पठारावर जाण्यासाठी सध्या नवीन रस्ता करण्याचे काम चालू आहे. रस्ता विभाग पेडणेचे अभियंते नारायण मयेकर जातीने लक्ष ठेवून आहेत.
(प्रतिनिधी)