'मोपा विमानतळ बांधकामठिकाणी, बॉक्साइटचे बेकायदा उत्खनन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 21:17 IST2019-02-13T21:17:01+5:302019-02-13T21:17:25+5:30
खाण खात्याकडे तक्रार

'मोपा विमानतळ बांधकामठिकाणी, बॉक्साइटचे बेकायदा उत्खनन'
पणजी : गोव्यात मोपा येथे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम करणाऱ्या जीएमआर कंपनीकडून पठारावर बेकायदेशीररित्या बॉक्साइट उत्खनन आणि वाहतूक केले जात आहे. याबाबत आम आदमी पक्षाने राज्य सरकारच्या खाण खात्याला तक्रारी पत्र लिहिले असून या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
पक्षाचे नेते प्रदीप घाडी आमोणकर या पत्रात म्हणतात की, ‘सर्वोच्च न्यायालयाने एका अंतरिम आदेशाव्दारे ‘मोपा’चे काम सध्या जैसे थे ठेवण्यास बजावले आहे. परंतु, त्याआधी जानेवारीच्या मध्यास या ठिकाणहून बॉक्साइटचे उत्खनन करुन वाहतूकही चालू होती, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. हा पठार बॉक्साइट साठ्याने समृध्द आहे. जीएमआर कंपनीने बेकायदेशीररित्या उत्खनन करुन विक्री चालवली असावी, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. बॉक्साईटचे किती उत्खनन किंवा वाहतूक झाली अथवा बांधकामाच्या ठिकाणी बॉक्साइटचा किती साठा करुन ठेवला आहे, याची माहिती मिळवावी आणि या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, बेकायदा खनिज उत्खनन ही राष्ट्रीय संपत्तीची ही चोरी असून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे.