'मान्सून' गोव्याच्या सीमेवर; सलग चौथ्या दिवशी राज्यात मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 12:02 IST2025-05-25T12:00:40+5:302025-05-25T12:02:17+5:30
आठ दिवस आधीच केरळात : कारवारपर्यंत पोहोचल्या सरी

'मान्सून' गोव्याच्या सीमेवर; सलग चौथ्या दिवशी राज्यात मुसळधार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नैऋत्य मान्सून तब्बल ८ दिवस अगोदरच केरळात दाखल झाला आहे. केवळ केरळात नव्हे तर कर्नाटकातील बहुतेक भागात आणि गोव्याच्या दक्षिण सीमेलगतच्या कारवार जिल्ह्यातही मान्सून दाखल झाला असून राज्यात केव्हाही दाखल होऊ शकतो.
आपल्या पहिल्या दीर्घ टप्प्याच्या अंदाजाशी थोडी फारकत घेताना यंदा नैऋत्य मान्सून ६ दिवस अगोदर केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी वर्तविला होता. परंतु हा दुसरा अंदाजही फोल ठरवत मान्सून तब्बल ८ दिवस अगोदर केरळ आणि कर्नाटकात दाखल झाला आहे.
२४ मे रोजी मान्सून कर्नाटकात दाखल झाल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. त्यामुळे गोव्यातही तो लवकरच म्हणजेच १ जूनपूर्वीच दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केरळात मान्सून दाखल होण्याची सामान्य तारीख ही १ जून ही आहे. त्यामुळे यंदाच्या मान्सूनने रेकॉर्ड ब्रेक एन्ट्री केली आहे. यापूर्वी २३ मे २००९ रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झालेला होता. त्यानंतर इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
नदी, चिरेखाणी, तलावासह धबधब्यांवर पोहोण्यास बंदी
उत्तर गोवा जिल्हाधिकारी यशस्विनी बी. व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी राज्यातील सर्व नद्या, चिरेखाणी, धबधबे, तलाव तसेच इतर पाणथळ ठिकाणी पोहण्यास आणि पाण्यात उतरण्यास बंदी घातली आहे. हा आदेश पुढील ६० दिवस लागू असेल. तसेच या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते, त्यात त्यांनी धबधबे, चिरेखाणी, तलाव, नदीमध्ये बुडून अपघाती मृत्यूची प्रकरणे समोर आल्याचे नमूद केले होते. या पत्राची दखल घेत दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. या आदेशात पाण्यात उतरण्यास व पोहण्यास बंदी घालण्यात आल्याचे म्हटले आहे.
१९ मे ऐतिहासिक नोंद
हवामान खात्याकडून अंदाज वर्तविताना नेहमीच ५ टक्केवर खाली होण्याची शक्यता असते. परंतु यावेळी फरक फारच जाणवला आहे. १९७५ नंतर ५० वर्षात सर्वात लवकर मान्सून दाखल होण्याची तारीख आहे १९ मे १९९०. त्यानंतर २००९ मध्ये २३ मे रोजी दाखल झाला होता. त्यामुळे ही तिसरी जवळची तारीख असे मानले जात आहे.
काणकोणात गेल्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे झाडे वीज वाहिन्यांवर उन्मळून पडल्याने बावीस वीज खांब मोडले. त्याचप्रमाणे वीज वाहिन्या तुटून पडल्या. त्यामुळे वीज खात्याचे सहा लाख सत्तर हजार रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती सहाय्यक वीज अभियंता गोविंद भट यांनी दिली.