फिरते वाचनालय ठरते वाचकांसाठी लाभदायक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 17:14 IST2023-08-25T17:14:12+5:302023-08-25T17:14:47+5:30
जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच युवक वाचनाकडे वळावे यासाठी हे फिरते वाचनालय सुरु केले आहे.

फिरते वाचनालय ठरते वाचकांसाठी लाभदायक!
- नारायण गावस
पणजी : कला व संस्कृती खात्यातर्फे मध्यवर्ती ग्रंथालयातर्फे सुरु करण्यात आलेले फिरते वाचनालय विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरत आहे. या फिरत्या वाचनालयाची गाडी राज्यातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पुस्तके वाचायला देत आहे. तसेच त्यांना वर्गात जाऊन मार्गदर्शकांकडून विविध पुस्तकांचे मार्गदर्शने केले जात आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच युवक वाचनाकडे वळावे यासाठी हे फिरते वाचनालय सुरु केले आहे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो. जी दुर्मिळ पुस्तके दुकानावर मिळत नाही अशी पुस्तके या वाहनामध्ये उपलब्ध आहे. ही पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला दिली जातात. तसेच प्रदर्शनही केले जाते. तसेच वर्गात चांगल्या विविध पुस्तकांची माहिती या विद्यार्थ्यांना दिली जात आहे, असे मध्यवर्ती ग्रंथालयाचे क्युरेएटर सुशांत तांडेल यांनी सांगितले.
सध्या एकच फिरते वाचनालय आहे लवकरच अशी आणखी फिरती वाचनालये सुरु केली जाणार आहे. ही फिरती वाचनालये राज्यातील ग्रामीण भागात जाऊन वाचनाविषयी जागृता करणार आहे. सध्या याला चांगली प्रसिद्धी मिळत आहे. जास्तीत जास्त लोक वाचनाकडे वळावे हा या मागचा मुख्य हेतू आहे, असे तांडेल यांनी सांगितले .
हे फिरते वाचनालय फक्त शाळांमध्ये नाहीतर तर गावागावात जात आहे. जर गावातील काही लाेकांनी आपल्या गावामध्ये हे फिरते वाचनालय बोलावले तर ते त्या गावात जाते. गावातील लाेकांना विविध पुस्तके वाचायला दिली जातात. नंतर पुन्हा एका महिन्याने ही पुस्तके वाचकांकडून घेतली जातात. लाेकांना वेगवेगळी दुर्मिळ पुस्तके वाचायला मिळतात यालाही लाेकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे सुशांत तांडेल म्हणाले.