विरोधकांच्या बैठकीला विजय सरदेसाईंसह आमदार वीरेश बोरकर यांची 'दांडी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:55 IST2025-07-16T12:53:34+5:302025-07-16T12:55:52+5:30
विरोधकांमधील दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर.

विरोधकांच्या बैठकीला विजय सरदेसाईंसह आमदार वीरेश बोरकर यांची 'दांडी'
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी संयुक्त विरोधकांच्या मंगळवारी बोलावलेल्या बैठकीस गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई तसेच आरजीचे आमदार वीरेश बोरकर फिरकले नाहीत. तर काँग्रेसचे आमदार कार्लस फेरेरा व एल्टन डिकॉस्ता, आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगास आणि क्रूझ सिल्वा उपस्थित होते. यावरुन विरोधकांमधील दुफळी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना युरी आलेमाव म्हणाले की, 'गोव्यातील जनता आमच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आमच्या कृतींची छाननी जनता करील. माझा कोणताही वैयक्तिक अजेंडा नाही; मी सरळ आणि स्वच्छ आहे. युरी म्हणाले की, सरकारने एका मोठ्या घोटाळ्यात स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हरित कराबाबतचा आपला तारांकित प्रश्न अतारांकित केला. युरी आलेमाव म्हणाले की, राजकीय मतभेद बाजूला ठेवून, आपण एकत्र येऊन भाजपचा पर्दाफाश करण्याचे काम करायला हवे. त्यासाठी आमचे प्रयत्न सरू राहतील.
आपचे आमदार व्हेंझी व्हिएगश म्हणाले की, 'गोमंतकीयांना भेडसावणारे प्रश्न विधानसभेत मांडून आम्ही सरकारला जाब विचारु. सर्व विरोधकांनी एकत्र यावे.' विरोधी आमदारांना सार्वजनिक मुद्दे मांडण्यासाठी वेळ मिळाला पाहिजे, असे आमदार कार्ल्स फेरेरा म्हणाले. अधिवेशनापूर्वी आणखी एक बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.