Missing trawler from tamilnadu found at goa | तामिळनाडूत चक्रीवादळात भरकटलेला ट्रॉलर गोव्याच्या किनाऱ्यावर धडकला
तामिळनाडूत चक्रीवादळात भरकटलेला ट्रॉलर गोव्याच्या किनाऱ्यावर धडकला

ठळक मुद्देट्रॉलरच्या मालकाशी संपर्क झाला असून, ते ट्रॉलरचा ताबा घेण्यासाठी विमानाने गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.अँथोनी नावाच्या इसमाच्या मालकीची ही बोट असून, जोसेफ नावाचा अन्य एक इसम या बोटीचा पार्टनर आहे.

मडगाव - तामिळनाडू येथे चक्रीवादाळात भरकटलेले एक ट्रॉलर आज सकाळी गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील बेताळभाटी येथे किनाऱ्यावर धडकला. ट्रालरचे इंजिन चालू असल्याने व आत कोणीच नसल्याने सुरुवातील पोलीसही चक्रावून गेले. नंतर या ट्रॉलरबददल सविस्तर माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर संबधितांनी सुटकेचा श्वास सोडला. बॉम्ब निकामी पथक, आंतकवाद विरोधी पथकांनाही घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. तटरक्षक दल तसेच नौदललाही पाचारण करण्यात आले होते.पेरियानायाकी असे या ट्रॉलरचे नाव असून, तो तामिळनाडू राज्यात नोंदणीकृत आहे. ट्रॉलरच्या मालकाशी संपर्क झाला असून, ते ट्रॉलरचा ताबा घेण्यासाठी विमानाने गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोव्याच्या सागरी हद्दीपासून ३00 नोटीकल माईल्स अंतरावर मासेमारी करताना ४ डिसेंबर रोजी या ट्रॉलरला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. तामिळनाडूतील थुुथुर जवळील वाल्लाविलय येथील मच्छिमारी मासेमारी करीत असताना चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. वीस ट्रॉलर बेपत्ता झाले होते. त्यातील अठरा ट्रॉलर सापडले तर दोन बेपत्ता होते. घटना घडली तेव्हा तटरक्षक दलाच्या जवानांनी ट्रॉलरवरील सर्व मच्छिमाऱ्यांना सुखरुप बचाविले होते.

बेताळभाटी येथे धडकलेल्या ट्रॉलरवर ७५९८८२४९३१ क्रमांक सापडला. या क्रमांकावर किनारी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी संपर्क साधला असता, तामीळनाडू येथे चक्रिवादाळात भरकटलेले हे ट्रॉलर असल्याचे आढळून आले. अँथोनी नावाच्या इसमाच्या मालकीची ही बोट असून, जोसेफ नावाचा अन्य एक इसम या बोटीचा पार्टनर आहे. परवा रविवारी स्थानिक मच्छिामाऱ्यांनी खोल समुद्रात हा ट्रॉलर हेलकावे खाताना बघितला होता. काल सोमवारी हा ट्रॉलर किनाऱ्यावर थडकाल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. स्पेशल ब्राचचे पोलीस अधिक्षक शोबीत सक्सेना यांनीही घटनास्थळी जाउन पहाणी केली. तटरक्षक दलही घटनास्थळी दाखल झाले होते. ट्रॉलर किनाऱ्यावर धडकल्याची माहिती मिळाल्यानंतर बघ्यांनीही गर्दी केली होती.

सध्या राज्यात पर्यटन मौसम सुरु असून, नाताळ व नववर्षही जवळ आले आहे. पर्यटन मौसम सुरु असताना, ट्रॉलर किनारपटटीवर धडकल्याने व त्याचे इंजिन चालू असल्याने व आतमध्येही कुणी नसल्याने सुरुवातील तर्कविर्तक मांडण्यात आले होते. पोलिसांचीही धावपळ उडाली. आंतकवादी कारवायासाठी तर ही बोट वापरली जात नव्हती ना अशी शंकाही सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होती. मात्र नंतर या ट्रॉलर मालकाचा पत्ता मिळाल्याने व सत्यस्थिती उघड झाल्याने संबधित यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला

Web Title: Missing trawler from tamilnadu found at goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.