मिकींना कोणत्याही क्षणी अटक
By Admin | Updated: April 11, 2015 02:20 IST2015-04-11T02:13:12+5:302015-04-11T02:20:01+5:30
मडगाव : मडगाव न्यायालयाने अटक वॉरन्ट जारी करून चोवीस तास उलटले, तरीही माजी मंत्री मिकी पाशेको न सापडल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

मिकींना कोणत्याही क्षणी अटक
मडगाव : मडगाव न्यायालयाने अटक वॉरन्ट जारी करून चोवीस तास उलटले, तरीही माजी मंत्री मिकी पाशेको न सापडल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक दिल्लीला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. पाशेकोंनी पलायन करू नये, यासाठी देशातील सर्व विमानतळांवर दक्षतेचा आदेश देण्यात आला असून लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे.
या संदर्भात दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई म्हणाले की, न्यायालयाचे वॉरन्ट पोलिसांना शुक्रवारी (दि.१0) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मिळाले. त्यानंतर आम्ही हालचाली सुरू केल्या आहेत. पाशेकोंच्या अटकेसाठी आवश्यक ते सर्व उपाय केले जातील.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता, त्याचा पुनर्विचार व्हावा यासाठी, तसेच या अर्जावर निकाल होईपर्यंत न्यायालयासमोर शरण येण्यापासून सूट मिळण्यासाठीचा अर्ज शुक्रवारीही सुनावणीस आला नाही. त्यापूर्वी गुरुवारी (दि.९) रात्री दिल्लीहून गोव्यात परतणारे पाशेको यांनी गोव्याचा बेत रद्द करून दिल्लीत राहणेच पसंत केले. मात्र, त्यास पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही. पोलिसांनी पाशेको यांच्या बेताळभाटी कार्यालयात वॉरन्ट जारी करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते तेथे नव्हते. त्यांच्या मित्राकडे चौकशी केली असता, त्यांचा पत्ता मिळू शकला नाही. त्यामुळे सर्व विमानतळांना सतर्क केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
मिकींविरुद्ध वॉरन्ट जारी करावे, यासाठी न्यायालयात धाव घेणारे अॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी या संपूर्ण प्रक्रियेबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. पोलिसांचा हा अक्षम्य गलथानपणा असल्याचे ते म्हणाले. दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई व कोलवाचे पोलीस निरीक्षक उत्तम राऊत देसाई यांना आपण सतर्क केले होते. पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेणे जरुरी होते, असे ते म्हणाले.
२00६ मध्ये राणे मंत्रिमंडळात कृषिमंत्री असताना वीज अभियंता कपिल नाटेकर यांना मारहाणीबद्दल पाशेकोंना मडगाव न्यायालयाने सहा महिन्यांच्या कैदेची शिक्षा फर्मावली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्याविरोधात पाशेको यांनी दाखल केलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने ३0 मार्च रोजी फेटाळला होता. तरीही पाशेको न्यायालयासमोर न आल्यामुळे अॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी मडगाव न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर मडगावच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पूजा कवळेकर यांनी गुरुवारी पाशेको यांच्या विरोधात अटक वॉरन्ट जारी केले होते. (प्रतिनिधी)