विदेशात जाण्याची मिकीची दारे बंद
By Admin | Updated: April 13, 2015 01:14 IST2015-04-13T01:14:15+5:302015-04-13T01:14:25+5:30
पणजी : माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर लुकआउट नोटीस जारी केली असली तरी त्यांचा पासपोर्ट पोलिसांजवळ

विदेशात जाण्याची मिकीची दारे बंद
पणजी : माजी मंत्री मिकी पाशेको यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर लुकआउट नोटीस जारी केली असली तरी त्यांचा पासपोर्ट पोलिसांजवळ असल्यामुळे विदेशात जाण्याची दारेही त्यांना बंद झाली आहेत. दरम्यान, त्यांना पकडण्यासाठी अटक वॉरंट घेऊन गेलेल्या पोलिसांना रविवारीही पाशेको हाती लागले नाहीत.
पाशेको अटक चुकविण्यासाठी देश सोडून जाण्याची भीती व्यक्त करून पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती. वास्तविक पाशेको हे देशाबाहेर जाऊच शकत नसल्यामुळे लुकआउट नोटीसची गरजही राहिली नाही; कारण नादिया तोरादो प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले पाशेको यांचा पासपोर्ट चौकशीच्यावेळी सीआयडीला सादर केला होता. अजूनही तो पोलिसांच्या ताब्यात आहे. नादिया प्रकरणातील तपास अधिकारी सुनीता सावंत यांनी तपासादरम्यान त्यांना पासपोर्ट सादर करण्यास लावले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप तो पाशेको यांना परत केलेला नाही.
मिकी पाशेको यांना शोधण्यासाठी गेलेले पणजी पोलिसांचे पथक दिल्ली येथेच ठाण मांडून आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पाशेको अद्याप पोलिसांना सापडले नसल्याची कबुली पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगनाथन यांनीही दिली. पाशेको यांचा मोबाईल बंद असल्यामुळे त्यांचे टॉवर लोकेशनही पोलिसांना कळू शकले नाही, अशी माहिती मुख्यालयातून देण्यात आली.
न्यायालयाच्या ताशेऱ्यांपासून वाचण्यासाठी पोलिसांना मिकींच्या बाबतीत धावपळ करणे क्रमप्राप्त आहे; परंतु पाशेको यांच्या शोधाच्या बाबतीत पोलीस किती गंभीर आहेत याबद्दलही साशंकता दिसून येते; कारण पाशेको यांचा पत्ता लावण्यासाठी टीम पाठविण्याव्यतिरिक्त पोलिसांनी काहीच केलेले नाही.
पाशेको यांचा मोबाईल सव्हेलन्सवर ठेवला असला तरी अशा परिस्थितीत ते आपला मोबाईल वापरण्याची जोखीम घेणार नाहीत. त्यांच्या निकटवर्तीयांच्या मोबाईलवर अद्याप पाळत ठेवली नसल्याची माहिती विशेष सूत्रांकडून देण्यात
आली. (प्रतिनिधी)