Mhapasa Urban Special Assembly on 21 to decide on mergers | विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी म्हापसा अर्बनची विशेष आमसभा २१ रोजी
विलीनीकरणावर निर्णय घेण्यासाठी म्हापसा अर्बनची विशेष आमसभा २१ रोजी


म्हापसा : म्हापसा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बॅँक ऑफ गोवाचे पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत (पीएमसी) विलीनीकरणाच्या दिशेने जाणाऱ्या पावलावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बँकेच्या भागधारकांची विशेष आमसभा २१ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. म्हापसा अर्बनचे अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर यांनी या संबंधीची माहिती दिली.

२४ जुलै २०१५ रोजी रिझर्व्ह बँकेने लागू केलेल्या आर्थिक निर्बंधानंतर बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणा-या म्हापसा अर्बन कॉ-ऑपरेटिव्ह बॅँक ऑफ गोवाच्या पुढील भवितव्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीनंतर विलीनीकरणाच्या प्रश्नाला बरीच गती प्राप्त झाली आहे. विलीनीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी जोरात प्रयत्न सुरु झाले आहेत.

मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीचा एक भाग म्हणून तसेच झालेल्या बैठकीची विस्तारीत माहिती संचालक मंडळातील इतर सदस्यांना देण्यासाठी दोन दिवसापूर्वी म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत तीन महत्त्वाचे असे ठराव मंजूर करण्यात आले. यात बँकेवर नव्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी होणाºया निवडणुका स्थगीत ठेवून पुढे धकलण्याचा निर्णय घेण्यात आला. विलीनीकरणाला संचालक मंडळाने मान्यता दिली. तसेच विलीनीकरणावर आमसभेची मंजूरी मिळवणे गरजेचे असल्याने त्यावर निर्णय घेण्यासाठी आमसभा बोलावण्याचे ठरवण्यात आले.

घेतलेल्या ठरावानुसार २१ सप्टेंबर रोजी भागधारकांची विशेष आमसभा बोलावण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. गुरूदास नाटेकर यांनी दिली. या बैठकीत विलीनीकरणावर आमसभेची मंजूरी घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले. २१ रोजी होणाºया आमसभेनंतर म्हापसा अर्बनची सर्वसाधारण आमसभा त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे नाटेकर म्हणाले.

शहरातील व्यवसायिकांचे हित सांभाळण्याच्या हेतूने २३ मार्च १९६६ साली गोव्यातील म्हापसा शहरात सुरू करण्यात आलेल्या या बहुराज्य बँकेवर लागू केलेल्या निर्बंधामुळे बँकेची आर्थिक स्थिती बरीच खालावली आहे. ठेवीदारांच्या ठेवी भागधारकांची गुंतवणूक अडकली आहे. बॅँकेतील दैनंदिन आर्थिक व्यवहार होत नसल्याने कामकाज हाताळणे सुद्धा कठीण झाले आहे. लागू असलेले निर्बंध फेब्रुवारीत काही अंशी शिथील करण्यात आले होते. गोव्यातील विविध भागात २४ शाखा असलेल्या म्हापसा अर्बनचे सध्या १ लाख १९ हजार भागधारक तसेच साडेतीन लाख खातेधारक आहेत. सुमारे दीडशे कोटी रुपयांची बँकेची स्वत:ची मालमत्ता आहे.


Web Title: Mhapasa Urban Special Assembly on 21 to decide on mergers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.