'माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 06:55 IST2025-11-06T06:54:10+5:302025-11-06T06:55:00+5:30
मडगाव रवींद्र भवनमध्ये अर्जाचे वितरण; योजनेला विरोध करणाऱ्यांचा घेतला समाचार

'माझे घर' योजना ही मोठी सुधारणा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : घरे कायदेशीर करण्यासाठी आणि लोकांचे घराचे स्वप्न साध्य करण्यासाठी 'माझे घर' ही योजना आणली आहे. मी माझ्या मतावर ठाम असून, गोव्यातील बहुतांश लोकांना या योजनेचा फायदा होणार आहे. जे कोणी आताच फायदा करून घेणार नाहीत त्यांना नंतर कधीच अशी संधी मिळणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल येथे केले.
'माझे घर' या योजनेचा शुभारंभदेशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला. राज्यातील ही सगळ्यात मोठी सुधारणा असून, कुळ आणि मुंडकार कायद्यानंतर माझे घर योजनेचा क्रमांक लागतो हे मी अभिमानाने सांगू शकतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
येथील रवींद्र भवनमध्ये काल बुधवारी माझे घर योजनेच्या अर्जाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक, उपाध्यक्ष मनोहर बोरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी मडगाव, फातोर्डा, नावेली व कुडतरी मतदारसंघातील माझे घर योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होती. मान्यवरांनी या योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.
मंत्री कामत म्हणाले, की माझे घर योजना ही मुख्यमंत्री सावंत यांनी खूप परिश्रम घेऊन तयार केली आहे. गरीब लोकांना सरकारचा आधार लागतो. म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारतासाठी गरिबांना डोळ्यांसमोर ठेऊन काम करतात. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री सावंत यांनी ही अत्यंत चांगली योजना आणली आहे. ज्यांनी विधानसभेत या योजनेला विरोध केला होता, जे ही योजना लोकांना फसविण्यासाठी असे म्हणत होते, तेच आज या योजनेचे अर्ज घेऊन जात आहेत. हे या योजनेचे यश आहे.
तुमची घरे कायदेशीर करणार हा माझा शब्द
माझ्या सरकारने 'माझे घर' ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी आणलेली आहे. जो १५ वर्षापासून येथे २८ फेब्रुवारी २०१४ पूर्वी स्थायिक आहे, त्याने बांधलेले घर कायदेशीर करण्यास माझे सरकार कटिबद्ध आहे. हा माझा शब्द आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
'योजनेला विरोध करणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षच'
भाऊसाहेब बांदोडकरांच्या काळात आणि माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक यांनी कुळ आणि मुंडकारांना सातत्याने पाठिंबा दिला. माझे घर योजनेसाठी महसूल संहिता, पंचायत महसूल संहिता आणि नगरपालिका संहितेमध्ये मोठ्या सुधारणा करून कायदा केला आहे. सध्या अनेक लोकांना वाटते ही योजना विनाकारण आणलेली असून, त्यापोटी त्यांनी विरोध केला आहे. हा विरोध करणाऱ्यांमध्ये विरोधकच आहेत, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
'सहा महिन्यांत सनदांचे वाटप करू'
यापुढे सहा महिन्यांनंतर माझ्याच हस्ते प्रत्येकाला मालकीच्या सनदा देण्यात येतील, हे मी ठामपणे सांगू शकतो. माझे घर या योजनेचा विचार करताना प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला आहे. गोमंतकीयांना हक्काचे घर मिळावे हेच माझे स्वप्न असून, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.