कला-साहित्य महोत्सवात व्यक्त झालेला सूर
By Admin | Updated: December 8, 2014 02:00 IST2014-12-08T01:59:12+5:302014-12-08T02:00:06+5:30
चुकीची धोरणे लादू नयेत यासाठी लोकशाही हे अस्त्र

कला-साहित्य महोत्सवात व्यक्त झालेला सूर
पणजी : राजकारण्यांकडून चुकीची धोरणे लादली जाऊ नयेत यासाठी लोकशाही प्रभावी अस्त्र आहे. धोरणाच्या बाबतीत राजकारणी कुठे चुकले तर मतदार माफ करीत नाहीत, हे स्पष्ट आहे. सध्या आहे त्याच व्यवस्थेत राहून राजकारणाच्या माध्यमातून चांगली धोरणे कशी आणता येतील, हे पाहिले तर उत्तम; कारण कायदे, नियम हे मोडण्यासाठीच असतात आणि या बाबतीत नवे कायदे केले तरी काहीही निष्पन्न होणार नाही, असा सूर कला व साहित्य महोत्सवात रविवारी व्यक्त झाला.
‘राजकारण चांगले धोरण ठरवू शकते काय?’ या विषयावरील परिसंवादात राजकीय अभ्यासक एम. आर. महादेवन, नारायण रामचंद्रन, विनय सहस्रबुद्धे, मंजित कृपलानी व नितीन पै यांनी भाग घेतला.
नारायण रामचंद्रन म्हणाले की, समाजाने नियोजनबद्धरीत्या काम केले, तर त्याचा राजकारण्यांकडून चांगली धोरणे आखण्यात बराच फायदा होईल.
महादेवन म्हणाले की, इंदिराजींनी आणीबाणी लागू केल्यानंतर काँग्रेसचे काय झाले, हे लोकांनी अनुभवले आहे. त्यामुळे राजकारणी चुकले तर जनता माफ करीत नाही, हे दिसून आले. लॅम्म फेलोशिप या उपक्रमाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, खासदारांच्या स्वीय साहाय्यकाला कोणते ज्ञान असावे, याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमातून ९८ पैकी २५ जण आज राजकारणात आले आहेत.
राजकीय पक्षांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा हवा, असे मत विनय सहस्रबुद्धे यांनी मांडले. ते म्हणाले की, आजकाल राजकीय पक्ष उमेदवार ठरवितानासुद्धा कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत. सुदृढ लोकशाहीसाठी बहुपक्षीय पद्धत फार उपयुक्त आहे.
मंजित कृपलानी यांनी मते मिळविण्यासाठी निवडणुकीच्या काळात मतदारांना आमिषे दाखविण्याचे जे प्रकार घडतात, त्याबद्दल सांगितले. अलीकडेच दक्षिण मुंबईत उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या मैदानात उतरल्या होत्या, त्या वेळचे थक्क करणारे अनुभव त्यांनी कथन केले. (प्रतिनिधी)