लोकमत न्यूज नेटवर्क, केपे: कार्यकर्ते आणि जनतेममध्ये जागृती करणे, त्यांचा उत्साह वाढविण्याबरोबरच संघटन बांधणे हाच भाजपा कार्यकर्ता मेळाव्याचा उद्देश आहे. राज्यभरात माझा प्रवास सुरू असून जुन्या आणि नवीन कार्यकर्त्याच्या गाठी भेटी घेत आहेत, असे प्रतिपादन प्रदेश भाजपाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले.
कुडचडे येथे कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, भाजप पदाधिकारी सर्वानंद भगत, कुडचडे भाजपा मंडळ अध्यक्ष मनोजकुमार नाईक, उपाध्यक्ष सिद्धार्थ देसाई, माजी मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत, भाजपा राज्य जिल्हा समितीचे सदस्य प्रदीप नाईक, प्रभारी सुरेश केपेकर आणि कुडचडे भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नाईक म्हणाले की, आज कुडचडे, सांगेत कार्यकर्त्याचे मिळावे घेण्याबरोबरच नवीन समिती जाहीर करण्यात आली आहे. त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
या मेळाव्याच्या निमित्ताने नवीन समिती निवडण्यात आली आहे. त्यांना शुभेच्छा देणे तसेच पक्ष पुढे नेण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवणे हा कार्यकर्ता मेळाव्याचा मुख्य उद्देश आहेत. यातूनच पक्ष वाढणार, संपर्क वाढून संघटनही मजबूत होणार आहे, असेही ते म्हणाले.
कुडचडे मंडळाचे नवीन अध्यक्ष मनोजकुमार नाईक म्हणाले की, आज गोवा भाजप अध्यक्ष नाईक यांच्या उपस्थितीत नवीन समिती घोषित करण्यात आले आहे. यात एकूण ३१ सदस्य असून पुढील पाच वर्षे ही समिती कुडचडे मंडळाचा कारभार सांभाळणार आहे.
... म्हणून युवा कार्यकर्त्यांची निवड
यावेळी बोलताना स्थानिक आमदार नीलेश काब्राल म्हणाले, आज कुडचडे मंडळ अध्यक्ष मनोजकुमार नाईक यांच्या नेतृत्त्वाखात्ल समितीची घोषणा करण्यात आली. या मेळाव्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जावे. अशा मेळाव्याने जुने नवीन कार्यकर्ते एकत्र येतात. त्यांच्यामध्ये पक्षासाठी काम करण्यासाठी उत्साह आणि मनोबल वाढते. नवीन आणि युवा कार्यकर्ते जुळतात. जर संघटन मजबूत करायचे आहे तर युवा कार्यकर्त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. ते ध्यानात घेऊन युवा कार्यकर्त्यांना पक्षाने जबाबदारी दिली आहे.