खाणप्रश्नी गोव्याने बाजू मांडली
By Admin | Updated: January 20, 2015 02:14 IST2015-01-20T02:12:35+5:302015-01-20T02:14:46+5:30
उद्योगमंत्री, खाण सचिव सहभागी

खाणप्रश्नी गोव्याने बाजू मांडली
पणजी : केंद्र सरकारने अध्यादेश जारी करून एमएमडीआर कायदा दुरुस्त केल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र तोमर यांनी बोलविलेल्या बैठकीत गोवा सरकारच्या वतीने उद्योगमंत्री महादेव नाईक तसेच राज्याचे खाण सचिव व अन्य अधिकारी सहभागी झाले.
गोवा सरकारने खाणींना लिज नूतनीकरण करून दिले असून खाणबंदीही मागे घेतली आहे. आता खनिज खाणी लवकर सुरू व्हाव्यात म्हणून केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ईसी दाखले देण्याचा मार्ग मोकळा करावा, असा मुद्दा बैठकीत गोव्यातर्फे मांडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशातील विविध खाणमंत्री बैठकीत सहभागी झाले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना गोव्यातील अन्य कामांमुळे दिल्लीस जाणे शक्य नव्हते व त्यामुळे त्यांनी मंत्री नाईक यांना बैठकीसाठी पाठवले होते. ज्या लिजांचे नूतनीकरण झालेले नाही, अशा देशभरातील सुमारे १९० खनिज खाण लिजांचे यापुढे लिलाव केले जाणार आहेत. त्यादृष्टीने तोमर यांनी सर्वांनाच बैठकीत काही सूचना केल्या.
(खास प्रतिनिधी)