कारगाड्या चोरट्यांची टोळी मुंबईत जेरबंद
By Admin | Updated: July 8, 2014 01:20 IST2014-07-08T01:14:32+5:302014-07-08T01:20:02+5:30
पणजी : जस्ट डायल या लोकांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या टेलीफोन सुविधेचा गैरवापर करून कारगाड्या चोरण्याचा धंदा करणारी टोळी घरफोड्या रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने पकडली.

कारगाड्या चोरट्यांची टोळी मुंबईत जेरबंद
पणजी : जस्ट डायल या लोकांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या टेलीफोन सुविधेचा गैरवापर करून कारगाड्या चोरण्याचा धंदा करणारी टोळी घरफोड्या रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पोलीस पथकाने पकडली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे नितीश गणेश नाईक आणि राजीव शर्मा अशी आहेत. राजीव हा मुंबई येथील आहे, तर नितीश हा मूळ वास्को येथील आहे; पण तो मुंबईला राहातो. मुंबई येथील मिरारोड येथे सकाळी ७ वाजता या दोघांनाही उत्तर गोवा घरफोडी विरोधी पथकाने पकडले. मंगळवारी दुपारी त्यांना पणजीत आणल्यावर पणजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून ४ दिवसांचा रिमांड त्यांना मिळविला आहे. पोलीस पथकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी ही माहिती दिली.
गोव्याहून चोरण्यात आलेली एक गाडी मुंबईला सापडल्याची माहिती गोवा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर याची चौकशी सुरू झाली आणि या रॅकेटचाही शोध लावण्यात पथकाला यश मिळाले. चोरलेल्या ५ पैकी २ कारगाड्या पोलिसांनी गोव्यात आणल्या. अन्य एक कारही कुठे ठेवली आहे याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे, अशी माहिती दळवी यांनी दिली. जप्त केलेल्या गाड्यांचे क्रमांक जीए-०६-डी- ७८१४ (रूपेरी रंगाची स्विफ्ट) व जीए-०३- पी ९०१४ (निळ्या रंगाची स्विफ्ट)असे आहेत. कारगाड्या चोरीच्या तक्रारी वेर्णा, पणजी आणि कळंगुट येथील पोलीस स्थानकांत नोंद झाल्या होत्या.
(प्रतिनिधी)