दोन वर्षात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 07:38 IST2025-05-20T07:38:12+5:302025-05-20T07:38:58+5:30

कुडचडे येथील मेळाव्यास मराठीप्रेमींचा प्रतिसाद, मराठीच्या संवर्धन, विकासासाठी प्रयत्न होणार

marathi should be given the status of official language within two years said subhash velingkar | दोन वर्षात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर

दोन वर्षात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा: प्राचार्य सुभाष वेलिंगकर

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडचडे : 'आपण मराठी प्रेमी आहोत. मराठी राजभाषा होणार आहे, एवढाच विचार करून, आपले ध्येय साध्य होत नसते, तर येत्या २०२६ पर्यंत मराठीप्रेमींची जागृती पर्व करावे लागेल. राजकारणाची खेळी करून आपला स्वार्थ साधून घेणाऱ्या, राजकारण्यांना जेव्हा आपण दाखवून देऊ, तेव्हा त्यांचे डोळे उघडेल. या निर्णायक लढाईसाठी सज्ज व्हा' असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार मेळाव्याचे निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केले.

कुडचडे येथील सर्वोदय हॉलमध्ये आयोजित मराठीप्रेमींच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर समन्वयक गो. रा. ढवळीकर, माजी नगराध्यक्ष अशोक नाईक, साहित्यिक उल्हास प्रभूदेसाई, अॅड. महादजी देसाई, अॅड. हर्षद गावस-देसाई, शिवानंद देसाई आदी उपस्थित होते. मराठीला समान दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली.

राजकारण्यांची खेळी

मराठी राजभाषा निर्धार समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर म्हणाले, गोमंतकीयांच्या शेकडो वर्षापासून जीवनादर्श बनलेल्या, अभिजान मराठी भाषेला डावलून कोकणी या बोलीभाषेला राजभाषा म्हणून स्थान दिले गेले. राज्यात जेव्हा कोंकणी राजभाषा झाली, तेव्हा जेमतेम, कोंकणी शिकणारी मुले होती. मराठी भाषा त्र्याहत्तर हजारांहून अधिक मुले शिकत होती. कोंकणी राजभाषा करेपर्यंत बहुतांश ग्रामपंचायतीचे व नगरपालिकांचे दफ्तर मराठीतून नोंदविले जात होते. ऐंशी टक्के लोकांची कोंकणी ही बोलीभाषा हा निकष लावून तो दर्जा दबावाने दिला गेला.

कोंकणीला विरोध नाही

ढवळीकर म्हणाले की, 'कोंकणीला राजभाषेचा दर्जा आहे, तो मागे घ्या, असे आमचे म्हणणे नाही. पण मराठीला डावलले गेले. देशात दिल्ली, पंजाब, तामीळनाडू व अन्यही राज्यात, एकाहून अधिक राज्यभाषा स्वीकृत आहेत. मग मराठीही राज्यभाषा झाली पाहिजे. ती मराठीप्रेमी सर्वस्वाने करून घेतील.

राजभाषेसाठी प्रतिज्ञा

याप्रसंगी उपस्थित मराठीप्रेमींना गोव्यात अभिजात मराठी भाषेवर होणारा अन्याय कायमचा मिटवण्यासाठी एकत्र येऊन एकदिलाने, अभिजात मराठीलाही गोव्याची राजभाषा करण्यापाठी कार्यरत राहून आपले ध्येय साध्य करुया अशी शपथ घेतली. मारुती करमजीनी यांनी प्रेरणा गीत सादर केले. मान्यवरांचा परिचय शिवानंद देसाई यांनी करून दिला. संजय राऊत-देसाईंनी अतिर्थीना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले

 

Web Title: marathi should be given the status of official language within two years said subhash velingkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.