उद्योगांत रोजगाराच्या अनेक संधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:36 IST2025-04-11T13:36:27+5:302025-04-11T13:36:53+5:30
बॉयलर अटेंडंट अभ्यासक्रमाचा लाभ; औद्योगिक सुरक्षा-आरोग्य परिषद

उद्योगांत रोजगाराच्या अनेक संधी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य सरकारने बॉयलर अटेंडंट अभ्यासक्रम सुरू केल्यामुळे उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. युवकांना त्यामुळे नोकऱ्या उपलब्ध होतील. सरकार औद्योगिक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन या गोष्टींना प्राधान्य देत आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
ताळगाव पठरावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर कारखाने आणि बाष्पक खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या उपस्थितीत तीन दिवसांच्या पहिल्या गोवा औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य प्रदर्शन परिषद २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कारखाने आणि बाष्पक खात्याचे सचिव संजीत रॉड्रिग्ज, खात्याचे संचालक अनंत पांगम व गोवा वेदांता कंपनीचे सीईओ नवीन जाजू हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, औद्योगिक अपघात व रस्ता अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यासाठी जागृती व प्रत्यक्ष कृती व्हायला हवी. कामगारांच्या सुरक्षेला सरकार प्राधान्य देते. 'स्किल ऑन व्हील' उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात वाहन जाईल व युवकांना औद्योगिक गरजांच्या अनुषंगाने प्रशिक्षित करेल. यासाठी २ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. युवकांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी विविध कार्यक्रम केले. आयटीआय केंद्रांचा दर्जा वाढवला. उद्योग संघटनांबरोबर करार करून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे काम केले. फार्मा उद्योग, सेवा व पर्यटन क्षेत्रामध्ये नोकऱ्यांसाठी बराच वाव आहे. यावेळी गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाना राज्यांतील उद्योजक सहभागी झालेले आहेत.
'स्किल-ऑन-व्हील्स'
ग्रामीण गोव्यात प्रत्यक्ष औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण देण्यासाठी दोन कोटी रुपयांचा 'स्किल-ऑन-व्हील्स' उपक्रम सुरू करण्यात आला आहे. औद्योगिक, अग्निशमन, विद्युत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण दिले जाईल.