पर्रीकर हे नव्या गोव्याचे शिल्पकार: मुख्यमंत्री; मिरामार येथे वाहिली आदरांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:51 IST2025-03-18T07:45:37+5:302025-03-18T07:51:44+5:30

मिरामार येथील त्यांच्या समाधीवर आदरांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते.

manohar parrikar is the architect of new goa cm pramod sawant tributes paid at miramar | पर्रीकर हे नव्या गोव्याचे शिल्पकार: मुख्यमंत्री; मिरामार येथे वाहिली आदरांजली

पर्रीकर हे नव्या गोव्याचे शिल्पकार: मुख्यमंत्री; मिरामार येथे वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची ओळख नव्या गोव्याचे शिल्पकार अशी आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यात महत्त्वाचे, असे पायाभूत सुविधा विकास प्रकल्प उभारण्याबाबत निर्णय घेतले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पर्रीकरांच्या पुण्यतिथीनिमित्त काल, सोमवारी मिरामार येथील त्यांच्या समाधीवर आदरांजली वाहिल्यानंतर ते बोलत होते.

राज्यातील प्रशासन, विकास प्रकल्प उभारण्याबाबत त्यांनी नेहमीच चांगले निर्णय घेतले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही पर्रीकरांचा उल्लेख नव्या गोव्याचे शिल्पकार, असा केला असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्रीकरांनी त्यांच्या काळात राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, जुवारी पूल, अटल सेतू यासारख्या विविध प्रकल्पांच्या कामाची सुरुवात केली होती. यापैकी अनेक विकास प्रकल्प पूर्ण झाले असून काही प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे पोहचले आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, उत्पल पर्रीकर, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते व अन्य उपस्थित होते.

पर्रीकरांचा आदर्श घेऊन काम

गोव्याच्या राजकारणावर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची वेगळी छाप आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर देशभरात त्यांच्या कार्याचा ठसा उमटलेला आहे. भावी पिढी त्यांचा आदर्श घेऊन गोव्याच्या हितासाठी काम करतील, अशी अपेक्षा असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नमूद केले.

बाबांची उणीव भासते

बाबांची आठवण केवळ पुण्यतिथीलाच नव्हे तर रोजच येते. आजही बाबांची उणीव भासते. अनेक आठवणींनी आज कंठ दाटून येत आहे. त्यांच्याकडून आपण बरेच काही शिकलो असून तेच समोर ठेवून आपण पुढे जात असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
 

Web Title: manohar parrikar is the architect of new goa cm pramod sawant tributes paid at miramar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.