फ्रान्सिस डिसोझा यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावे - म्हापसा नगरसेवक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 15:28 IST2018-09-25T15:17:04+5:302018-09-25T15:28:47+5:30
माजी शहर विकास मंत्री अॅड फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्याने म्हापसा पालिकेच्या सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी हा निर्णय बार्देसवासियांवर अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले.

फ्रान्सिस डिसोझा यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावे - म्हापसा नगरसेवक
म्हापसा - माजी शहर विकास मंत्री अॅड फ्रान्सिस डिसोझा यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आल्याने म्हापसा पालिकेच्या सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी हा निर्णय बार्देसवासियांवर अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. त्यांच्या जागी तालुक्यातील किमान दुसऱ्या आमदाराला स्थान मिळवणे आवश्यक होते. तसे न झाल्याने अमेरिकेतून उपचार घेवून परतल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी सत्ताधारी गटाने केली आहे.
म्हापसा पालिकेच्या एकूण २० नगरसेवकापैकी १७ नगरसेवक सत्ताधारी डिसोझा यांच्या गटाचे आहे. डिसोझा यांना पक्षातून काढून टाकण्यासंबंधी भाजपाने घेतलेल्या निर्णयावर भाष्य करण्यास या गटाने नकार दिला. पण शहराच्या विकासाच्या गतीवर मात्र त्याचे नक्की परिणाम होणार असल्याचे मत पालिकेचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केले. अमेरिकेत सुरु असलेले उपचार पूर्ण करुन डिसोझा ऑक्टोबरात परतल्यानंतर त्यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी यावेळी केली.
जेष्ठ नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांनी सुद्धा निर्णयावर नाराजी व्यक्त केली. आपण या संबंधी भाजपा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या सोबत चर्चा केली असून पुढील दोन दिवसात त्यांनी म्हापसा मंडलासोबत चर्चा करण्याचे आश्वासन आपल्याला दिले असल्याची माहिती पत्रकारांना दिली. डिसोझा यांच्यामुळे शहरातील बरीच काम जलदगतीने होत होती असेही ते म्हणाले.
भाजपा सरकारात बार्देस तालुक्याला मंत्रिमंडळातून पहिल्यांदा डावलण्यात आल्याचे मत नगरसेवक संदीप फळारी यांनी व्यक्त केले. बार्देस तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांचा फायदा व्हायचा. लोकांसाठी ते सततपणे उपलब्ध असायचे असेही ते म्हणाले. त्यामुळे सरकारने किमान ते परते पर्यंत वाट पाहणे गरजेचे होते असेही मत व्यक्त केले. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांवर अन्याय झाला असून त्यांनी आपली गाऱ्हाणी कोणाकडे मांडावी असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
माजी नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी सुद्धा शहरासाठी हा निर्णय परिणामकारक ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. २००२ नंतर पक्षाच्या प्रगतीसाठी खास करुन अल्पसंख्यांक समाजात पक्षाला उभारणी देण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते असे नगरसेवक तुषार टोपले यांनी सांगितले. यावेळी डिसोझा यांचे सुपूत्र तसेच नगरसेवक जोशुआ डिसोझा यांनी सुद्धा सदरचे वृत्त धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले.