मी प्रत्यक्ष अनुभवलेले मनोहरभाई!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:55 IST2025-12-13T13:55:55+5:302025-12-13T13:55:55+5:30
माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची आज १३ डिसेंबर रोजी ७०वी जयंती. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच.

मी प्रत्यक्ष अनुभवलेले मनोहरभाई!
महेश कोरगांवकर, काणका-बांध, म्हापसा
पर्रीकर यांचा स्वीय सचिव बनण्याचे भाग्य मला लाभले. त्यांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालो. मनोहरभाई नावाचा परिस मला लाभला. 'परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले सुवर्णची झाले' या ओळी मला तंतोतंत लागू पडतात. आज मनोहर भाईच्या सत्तराव्या जयंतीदिनी माझ्या भावना उचंबळून येत आहेत. माझ्या जीवनातून त्यांना वजा केले तर बाकी शून्य राहाते. एवढा माझ्यावर, माझ्या जीवनावर, माझ्या वाटचालीवर त्यांचा प्रभाव आहे.
बालपणीचे दिवस मस्त मजेचे सोनेरी दिवस होते. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जायचो. आम्ही एकत्र खेळलो, बागडलो, कवायती केल्या, संघाची गाणी एकासुरात गायलो, बौद्धिके ऐकली. संघाची शिकवण आमच्या मनावर कोरली गेली होती, म्हणून आमच्या जीवनाला शिस्त लागली. कालांतराने मी संघाचा मुख्य शिक्षक झालो. तेव्हा मनोहरभाई म्हापसा शहराचे संघचालक होते. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला संघशाखेत प्रथम लाभली.
काणका-बांध येथील संघ शाखेव्यतिरिक्त त्यांचे माझ्या घरीही येणे व्हायचे. मीही त्यांच्या घरी जायचो. त्यांच्या घरी सर्व स्वयंसेवकांना मुक्तद्वार असायचे. कधीही गेल ताईबाय (त्यांची आई) आमचे मायेने स्वागत करायच्या. त्यांच्या स्वयंपाक घरापर्यंत आमचा वावर होता. आमच्या घरी चहाबरोबर दिले जाणारे माझ्या आईच्या हातचे घावणे भाईना फार आवडायचे. ते आमच्या घरी जेवलेतसुद्धा. माझ्या बाबांशीही त्यांची छान दोस्ती जमली होती. त्यावेळेस आमची परिस्थिती बेताचीच होती; तरीही ते आमच्या घरात सहज वावरायचे. सर्वामध्ये मिसळायचे. माझे बाबा त्यांना 'भाई' म्हणायचे आणि मी संघ शाखेत त्यांच्याशी सलगी असल्याने सरळ मनोहरच म्हणायचो. माझ्या बाबांनी मला त्यांना भाई म्हणायला सांगितले. म्हणून मग मी त्यांना भाई म्हणायला लागलो. नंतर ते सर्वांचेच 'भाई' झाले. त्यांच्या स्वभावात साधेपणा होता. मला आठवतंय माझ्याकडे संघ शिक्षा वर्गाला जायला काळे बूट नव्हते, तेव्हा मनोहरभाईनी मला आपले काळे बूट दिले. माझ्या बुटांचा नंबर आठ होता आणि मनोहर भाईचा दहा. तरीही मी त्यांचे बूट वापरून वेळ मारून नेली. एकेक आठवण अशी मनाच्या कप्प्यात घर करून आहेत. त्यांच्याबरोबर नंतर घनिष्ठ मैत्री झाली.
मी महाविद्यालयात शिकत असताना मनोहर भाईनी हायड्रोपॅक नावाची नटबोल्टस् तयार करणारी फॅक्टरी थिवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये सुरू केली होती. सुट्टीत त्यांचे कार्यालय सांभाळण्याची संधी त्यांनी मला दिली. माझे वाणिज्य शाखेतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या याच आस्थापनात मी पहिली नोकरी केली. मनोहर भाई कित्येक गरजू संघ स्वयंसेवकांना आपल्या आस्थापनात काम देत होते. ज्या कुणा संघ स्वयंसेवकाला काम हवे असेल त्यांना ते आपल्या फॅक्टरीत सामावून घ्यायचे. त्या काळात सहज नोकरी उपलब्ध करून देणारे उद्योजक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यावेळी माझा पहिला पगार सहाशे रुपये होता.
७० च्या दशकात आणीबाणीचा आली. त्यावेळी मनोहरभाई आयआयटी पवईत शिकत होते. देशावर आलेल्या संकटाने ते व्यथित झाले होते. त्यांनी छुप्या मार्गाने आणीबाणीला विरोध करण्याचे काम चालविले होते. पुढे मग जनसंघाचा जनता पक्ष झाला. म्हणजे जनसंघ जनता पक्षात विलीन झाला. मोरारजी देसाईचे सरकार आले. पुढे विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाले. त्यावेळेस मनोहरभाईनाही राजकारण खुणावू लागले. राजकारणाचा त्यांचा बराच अभ्यास होता. आणीबाणीच्या काळात बीबीसीच्या बातम्या ऐकून आम्हाला ते सर्व माहिती द्यायचे.
मनोहरभाई राजकारणावर लक्ष ठेवून होते. संघाची योजना अशी झाली की, त्यांना भाजपाचे काम करायला सांगण्यात आले. आणि मग सुरू झाला त्यांचा राजकीय प्रवास. पहिल्यांदा उत्तर गोवा लोकसभेसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्याबरोबर राजेंद्र आर्लेकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, विनय तेंडुलकर, सदानंद तानावडे यांना भाजपातर्फे राजकारणात उतरवले गेले. श्रीपाद (भाऊ) नाईक दक्षिण गोव्यासाठी लोकसभेचे उमेदवार ठरले. दोघांनीही गोवा पिंजून काढला. मनोहरभाईबरोबर मीही प्रचारासाठी उत्तर गोवा फिरत होतो. मनोहरभाईनी गोवा पालथा घातला होता. राजकारणात नवखे असूनही त्यांनी प्रथम पदार्पणातच १८००० मते घेतली. डिपॉझिट जप्त झाले खरे; परंतु भारतीय जनता पक्ष उदयोन्मुखपक्ष म्हणून गोव्याच्या राजकारणात स्थिरावला.
गोवाभर फिरतानाच मनोहर भाईंना गोव्याच्या आणि पर्यायाने जनतेच्या प्रश्नांची नव्याने ओळख झाली. राजकारणाद्वारे आपण गोव्याचे प्रश्न सोडवू व गोव्याचा चेहरा मोहरा बदलवू हा ठाम विश्वास त्यांना होता. वास्तविक लोकसभा निवडणूक झाल्यावर झालेल्या दारुण पराभवाने मला तरी असे वाटले होते की, आता सगळे संपले. मी निराश झालो होतो. पण मनोहरभाई द्रष्टे होते. त्यांना आपण गोवा सहज पादाक्रांत करू हा आत्मविश्वास पहिल्या लोकसभा निवडणुकीने दिला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांना पणजीचे तिकीट मिळाले. मला तर आश्चर्य वाटले होते की म्हापशात राहून मनोहरभाई पणजीत कसे निवडून येणार? पण त्यांनी इतिहास घडवला. विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत त्यांनी विजयश्री खेचून आणली. प्रथमच भाजपाचे चार आमदार निवडून आले. त्यावेळेस मगोबरोबर भाजपाची युती होती. गोव्यात भाजप सत्तेत येईल असे भल्याभल्यांना वाटत नव्हते; परंतु ते मनोहरभाईनी आपल्या नेतृत्वाने आणि अथक परिश्रमाने खरे करून दाखविले.
त्यांना जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण होती. त्यांची राजकारणात अशी घोडदौड सुरू झाली की, त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. लगेच त्यांची वर्णी देशपातळीवर लागली. त्यांच्या कर्तृत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना भारताचे संरक्षणमंत्री बनवले. त्यांचा स्वीय सचिव होण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यांचे राजकारण मला जवळून पाहाता आले. मोठे झाले तरी त्यांचे पाय जमिनीवरच राहिले. उच्चपदी पोचूनही आमच्याशी त्यांचे वागणे पहिल्यासारखेच होते. त्यांचा स्वीय साहाय्यक असल्याने मला त्यांच्याबरोबर सदैव राहणे क्रमप्राप्त होते. त्यांच्या कामाचा उरक, धडाडी, दूरदृष्टी, बोलणे-चालणे हे सगळे मी जवळून अनुभवले. त्यांचा पीए म्हणून काम करताना मीही कसलीच कसर ठेवली नाही.
आठवतो मला तो राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा काळ. 'मंदिर वही बनायेंगे' हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेचा होता, तरी त्याचे गोव्यातील नेतृत्व मनोहरभाईनीच केले होते. त्या सर्व कार्यक्रमात मी दिवसरात्र त्यांच्यासोबत होतो. ते सांगतील ती कामे करायचो. मी त्यांची मर्जी संपादन केली होती. मनोहरभाई माझे सर्वस्व झाले होते. रामज्वराने आम्ही सगळे झपाटलो होतो. त्यांची आई म्हणायची, "महेश आता तुमच्या मनोहरभाईने राम मंदिर मनावर घेतले आहे, म्हणजे ते झालेच म्हणून समज." वास्तविक मनोहरभाई देव देव करणारे नव्हते. मात्र रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाचा मार्ग भाजपाला सत्ता प्रदान करील, याची त्यांना पूर्ण खात्री होती.
भाईचा लोकसंपर्क दांडगा होता. लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण होती. ते दूरदर्शी होते. पणजीत निवडून आल्यावर त्यांनी घरोघरी संपर्क ठेवला होता. मी त्यांचा स्वीय साहाय्यक म्हणून वावरत होतो. त्यांच्याबरोबर मलाही सगळीकडे फिरावे लागायचे. एरवी लग्नसमारंभात विशेष न रमणारे मनोहरभाई माझ्या लग्नाला मात्र बराच वेळ काढून आले होते. चक्क माझ्या लग्नात ते माझ्या अगोदर हॉलमध्ये हजर होते. त्यांनीच माझं हॉलमध्ये स्वागत केलं. लग्नाचे वधुवरांचे फुलांचे हार आम्ही ऑर्डर केले होते; पण आणायचे राहून गेले. त्यामुळे झालं असं की, शुभमंगल सावधान झालं आणि भटजींनी हार आणा सांगितलं, तेव्हा बघतो तर हारच नाहीत. सगळ्यांची एकच धावपळ उडाली. तेव्हा कळले की हार आणलेलेच नाही. मग कोणीतरी एक जण हार आणायला धावला. तोपर्यंत मनोहरभाईनी सजावटीतल्या फुलमाळा काढून त्या जोडल्या. त्यांनी त्यांचे दोन मस्त हार बनवून आमच्या हातात दिले आणि म्हणाले, तुमचे ऑर्डरचे हार येईपर्यंत हे घाला. त्यामुळे शुभमुहूर्तावर हार गळ्यात पडले. त्यानंतर ऑर्डरचे हार आले, तेही घातले.
मनोहरभाईनी मला वळण लावले. शिस्त शिकवली. सार्वजनिक जीवनात चारचौघात वावरतानाचे संकेत शिकवले. मला वागणुकीचे धडे दिले. काही चुकले तर ते सांगायचे. ते मला नेहमी सांगायचे की, आधी माझं सगळं बोलणं ऐकून घे, मध्ये बोलू नकोस. सगळं झाल्यावर झालं का तुमचं बोलून, आता माझं ऐकाल का? अशी मृदू मुलायम वागण्याची पद्धत त्यांनीच मला शिकवली. प्रसंगी मी भांडलोही असेन त्यांच्याशी, राजकारणात मतभेद होणारच. एकदा मी राग धरून घरीच बसलो, तर त्यांनी स्वतः येऊन माझी समजूत काढली.
आज त्यांच्या अनंत आठवणींचे काहूर मनात दाटले आहे. काही वर्षापूर्वी माझा पन्नासावा वाढदिवस होता. मनोहरभाई त्यावेळेस संरक्षणमंत्री होते. ते दिल्लीत होते, पण तरी माझा वाढदिवस त्यांच्या लक्षात होता. मला येतो म्हणून कळवले होते. मात्र नंतर बैठक लांबल्याने 'तू केक कट करून घे मी नंतर पोचतो.' असं त्यांनीच फोन करून सांगितलं. नंतर काय झालं, काय माहीत. लगेच म्हणाले येतो, थांब. मिटिंग आटोपती घेऊन माझ्या घरी आले सुद्धा. देशाचे संरक्षणमंत्री खास दिल्लीहून माझ्या वाढदिवसाला आले.. आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. किती ही आपल्या माणसाबद्दलची ममत्वाची भावना?
एक प्रसंग तर हेलावणाराच होता. माझा मोठा भाऊ संदीप मुंबईहून येताना अपघातात मृत्युमुखी पडला. आमच्या कुटुंबावर जणू आकाशच कोसळले. त्यावेळेस भाईनी स्वतः येऊन माझे सांत्वन केले. मला हृदयाशी धरून धीर दिला. त्या बारा दिवसांत तीनवेळा आमच्या घरी येऊन त्यांनी मला आधार दिल्याने आम्ही सावरू शकलो. खरंच 'भाई द ग्रेट.' त्यांच्या रूपाने मला मोठा भाऊच मिळाला होता. त्या प्रसंगात त्यांचे धावून येणे मी कधीच विसरू शकणार नाही. माझे भाईसोबत बंधुत्वाचे, मित्रत्वाचे नाते होते. त्यामुळेच मी मला खटकलेल्या गोष्टी दाखवून द्यायचो. ते कुठे चुकले व कसे व्हायला हवे होते त्याबद्दल सांगायचो. तेही ऐकून घ्यायचे. तशी कृतीही करायचे.
एकदा मनोहरभाईसोबत मी व ड्रायव्हर अनिल मिरामारमार्गे राज्यपालांना भेटायला जात होतो. भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीजवळ पोचल्यावर मी भाईना म्हटले, 'भाई भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीजवळ समाधीसाठी जागा आरक्षित करून ठेवायला हवी.' भाई म्हणाले, 'अरे पण कोणाची?' तेव्हा मी म्हणालो, 'भाई, तुमची.' तेव्हा ते म्हणाले, 'अरे वेडा आहेस का? मी त्यांच्या एवढा मोठा कुठे आहे?' देवजाणे हा विचार तेव्हा माझ्या मनात का आला. पण तेव्हा मला माहीत नव्हतं की मी बोललेलं लवकरच सत्यात उतरेल.
भाईंच्या मृत्यूनंतर सरकार त्यांच्या समाधीसाठी जागा शोधत होतं. सर्वप्रथम कांपालचा विचार झाला; पण वनखात्याकडून विरोध होईल, अशी भीती निर्माण झाली. जागा शोधण्याच्या टीममध्ये मीही होतोच. शेवटी भाऊसाहेब बांदोडकरांच्या समाधीजवळच भाईची समाधी बांधण्याबाबत सर्वानुमते शिक्कामोर्तब झाले. होय तीच त्यांच्या समाधीसाठी योग्य जागा होती.
शेवटच्या काळात मनोहर भाई कर्करोगामुळे पुरते कोलमडले होते. मृत्यू समोर दिसत असताना, त्यांनी मला आणि अवघ्याच काही शाखेतल्या सवंगड्यांना भेटीसाठी बोलावलं. प्रत्येकाची आस्थेनं विचारपूस केली. माझ्याशी बोलताना त्यांना एकदम आठवलं की मला ट्रान्सफर हवी होती. मी तो विषय काढणारच नव्हतो, परंतु त्यांनीच.. अरे तुझ्या ट्रान्सफरचे राहूनच गेले की रे.. कुठे पाहिजे होती तुला पोस्टिंग असं विचारलं आणि लगेच पीएला लेटरहेड आणायला सांगून माझ्या ट्रान्सफरची ऑर्डरही काढली. मला तर रडूच कोसळलं. कोपऱ्यात जाऊन तोंड लपवून स्फुंदून स्फुंदून रडलो. जाता जाता आठवण ठेवून माझं भलं करून जाणारे मनोहरभाई...
भाई... तुमची खूप आठवण येते !!!