स्वप्नसाक्षात्काराचा सच्चा सेनानी मनोहर पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:41 IST2025-12-13T13:41:01+5:302025-12-13T13:41:01+5:30
राष्ट्रीय आणि स्थानिक राजकारणात अभूतपूर्व ठसा उमटवणाऱ्या मनोहर पर्रीकरांच्या ७० व्या जयंतीच्या निमित्ताने आज १३ डिसेंबर रोजी त्यांचा स्मरणोत्सव साजरा करूया.

स्वप्नसाक्षात्काराचा सच्चा सेनानी मनोहर पर्रीकर
अजिंक्य सालेलकर, कुडचडे
मनोहर गोपाळकृष्ण प्रभपर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी म्हापशात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९७८ मध्ये त्यांनी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) धातुशास्त्र अभियांत्रिकीत पदवी मिळवली. मुख्यमंत्री बनलेले पर्रीकर पहिले आयआयटीयन होते. जडणघडणीच्या काळात त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव होता, शालेय वयातच ते संघाचे सदस्य झाले होते. आरएसएसची मूल्ये आणि शिस्तीच्या मुशीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आकार घेतला. पर्रीकर यांनी १९९० च्या दशकात भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून राजकीय प्रवासाला प्रारंभ केला. कुशल नेतृत्वाने त्यांनी गोव्याच्या राजकारणात अल्पावधीत प्रतिष्ठा मिळवली.
पर्रीकर यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा उपयोग सत्तेच्या गर्वासाठी कधीच केला नाही. साधी जीवनशैली, साधे कपडे, कुठलाही दिखावा नाही हेच त्यांचे वैशिष्ट्य. मुख्यमंत्री म्हणून गोव्यात पायाभूत सुविधा, शिक्षण क्षेत्र, पर्यटन क्षेत्र यात मोठे बदल घडवले. ई-गव्हर्नन्स, पारदर्शक प्रशासन, भ्रष्टाचारविरोधी धोरणे अशा विविध योजनांतून त्यांनी विकासाची नवी व्याख्या निर्माण केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये पर्रीकर यांची भारताच्या संरक्षणमंत्रिपदी नियुक्ती केली. संरक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव नसताना पर्रीकर यांनी परिवर्तनकारी नेता म्हणून आपली क्षमता सिद्ध केली. सैनिक दलाचे आधुनिकीकरण केले. आपल्या देशात संरक्षण साहित्याचे उत्पादन करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. भारतात शस्त्रास्त्र, विमान आणि तंत्रज्ञानाचा विकासास प्रोत्साहन दिले. पर्रीकर यांनी २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकची योजना व अंमलबजावणी केली. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील दहशतवादी तळावर हल्ला केला.
भारताच्या संरक्षण धोरणात महत्त्वपूर्ण बदल केले, निवृत्त सैनिकांसाठी समान पेन्शन सुनिश्चित करण्यासाठी दीर्घकालीन ओआरओपी योजनेची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारताच्या सैनिकी धोरणात ठोस सुधारणांची दिशा दिली. पर्रीकर यांची स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा, निर्णयक्षमता आणि देशभक्ती या सद्गुणांची परंपरा येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारी आहे. मोपा विमानतळाचे स्वप्न त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाहिले होते.
२०१४ मध्ये त्यांनी भारताचे संरक्षणमंत्रिपद स्वीकारले तेव्हा त्यांनी संरक्षण क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात केली. त्यांनी लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न केले. देशाच्या सुरक्षा धोरणांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताची संरक्षण क्षमता ताकदवान झाली. मनोहर पर्रीकरांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा अत्यंत साधा, मोकळा स्वभाव. त्यांच्यापासून नव्या पिढीला स्वप्न पहाण्याची, कठोर परिश्रम करण्याची आणि जनतेसाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. कर्करोगाशी झुंजत असतानाही त्यांनी सार्वजनिक कार्य सोडले नाही. १७ मार्च २०१९ रोजी पॅनक्रियाटिक कॅन्सरशी लढा देताना पर्रीकरांचे निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन.