'मन की बात' चा विश्वविक्रम होईल; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2023 12:36 IST2023-05-01T12:36:18+5:302023-05-01T12:36:48+5:30
शंभराव्या कार्यक्रमास गोमंतकीयांनी दिला उदंड प्रतिसाद

'मन की बात' चा विश्वविक्रम होईल; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गौरवोद्गार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांशी संवाद साधण्यासाठी 'मन की बात' कार्यक्रम सुरू करून शंभर मालिका केल्या. असा विक्रम याआधी कोणत्याही पंतप्रधानानी केलेला नाही. त्यामुळे या विश्वविक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद व्हायला हवी, असे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १०० वा 'मन की बात' कार्यक्रम ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांना आवाहन केले होते. राज्यपाल, मुख्यमंत्री, सभापती व इतर मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघात हा कार्यक्रम पाहिला.
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई या कार्यक्रमात राजभवनावरच सहभागी झाले. राजभवनात त्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान मन की बात ही आपल्या देशाची मोठी उपलब्धी आहे. असे कार्यक्रम यापूर्वी नेल्सन मंडेला यांनी आयोजित केले होते, असे राज्यपाल म्हणाले.
सभापती रमेश लवडकर यांनीही आपल्या कार्यकर्त्यासह हा कार्यक्रम पाहिला. सर्व मंत्री आणि आमदारांनी आपापल्या मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्याच्या समवेत हा कार्यक्रम सामूहिकरित्या पाहिला.
१ लाख लोकांचा सहभाग
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मन की बात कार्यक्रमात गोव्यात पक्षाच्या माध्यमातून १ लाख लोकांनी सहभाग घेतल्याचा दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमाचे शंभर एपिसोड केले हा मोठा विक्रमच आहे. सम्राट थिएटरमध्ये या कार्यक्रमात ५५० जणांनी यात भाग घेतला. १६०० बूथवर तसेच अन्यत्र आम्ही व्यवस्था केली होती. राजभवनवरही राज्यपालांसोबत ५०० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला.
कॉंग्रेसमध्ये असतानाही मी 'मन की बात' पाहायचो : सिक्वेरा
काँग्रेसमध्ये असतानाही मी मोदीजींचा मन की बात कार्यक्रम पाहात होतो, असे आमदार आलेक्स •सिक्वेरा यांनी प्रांजळपणे सांगितले. सिवचेरा हे आठ काँग्रेसी फुटीर आमदारांपैकी एक आहेत. विरोधकांना टोला लगावताना ते म्हणाले की, राजकारण बाजूला ठेवून विकासावर चर्चा करण्याची ही वेळ आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"