मनमोहन सिंगांवर टीका केलीच नव्हती!
By Admin | Updated: January 21, 2015 02:08 IST2015-01-21T02:08:03+5:302015-01-21T02:08:52+5:30
रवींचे नोटिसीला उत्तर : प्रदेशाध्यक्षांना पत्र

मनमोहन सिंगांवर टीका केलीच नव्हती!
पणजी : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरुद्ध मी काहीच बोललो नव्हतो, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे नेते रवी नाईक यांनी आपल्याला बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटिसीला उत्तर देताना प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रातून केले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर आपण केव्हाही टीका केली नव्हती. आपल्याविरुद्धचे आरोप हे रचले गेले होते, असे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांना लिहिलेल्या पत्रात नाईक यांनी म्हटले आहे. तसेच आपण निवडणूक जिंकण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नसल्याचा आरोपही त्यांनी फेटाळला आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर आपण प्रचार सुरू केला होता. त्या काळात किती लोकांची भेट घेतली त्यांची नावे त्यांनी पत्रात लिहिली आहेत. अपक्ष आमदार रोहन खंवटे आणि चर्चचे फादर यांचाही त्यात उल्लेख आहे. ज्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या त्यात आमदार पांडुरंग मडकईकर आणि पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची नावे आहेत.
निवडणुकीला अवघे १५ दिवस असताना आपल्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे आपल्याला अगदी कमी दिवस प्रचारासाठी मिळाले. मिळालेल्या दिवसांत घेण्यात आलेल्या भेटीगाठी, कोपरा बैठका आणि जाहीर सभा यांच्या वेळा आणि तारखा यासह माहिती पत्रात नमूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)