मांडवीतील मासे घातक
By Admin | Updated: January 20, 2015 02:15 IST2015-01-20T02:09:21+5:302015-01-20T02:15:11+5:30
प्रदूषण वाढल्याचा अहवाल : पाण्यात धोकादायक जंतूचे प्रमाण अधिक

मांडवीतील मासे घातक
पणजी : मांडवी नदीत विविध कारणास्तव ‘फेकल कॉलिफॉर्म’चे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी अनेकदा करत असतात. या तक्रारींना बळकटी देणारा अहवाल शासकीय पातळीवर तयार झाला असून तो शासकीय यंत्रणांकडून राष्ट्रीय हरित लवादासही सादर केला जाणार आहे.
मांडवी नदीतील कॅसिनो जहाजांचा विषय अगोदरच हरित लवादासमोर गेलेला आहे. कॅसिनो जहाजांनी सांडपाणी व अन्य घाण मांडवी नदीत सोडू नये म्हणून शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे; कारण राष्ट्रीय हरित लवादापर्यंत हा विषय पोहोचला असून लवादाने याविषयी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांच्या याचिकेची दखल घेतलेली आहे. राज्य सरकारचे पर्यावरण खाते, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळानेही यापूर्वी कॅसिनो व्यावसायिकांना काही सूचना केल्या आहेत. राष्ट्रीय हरित लवादाने दर तीन महिन्यांनी मांडवी नदीतील पाण्याचे नमूने घ्या व तपासून पाहा, अशी सूचना गोव्याच्या शासकीय यंत्रणांना केली आहे. त्यानुसार मांडवीतील पाणी तपासले जाते.
गेल्या २४ आॅक्टोबर रोजी सरकारच्या पर्यावरण खात्याचे संचालक श्रीनेत कोटवाले, एनआयटीचे सहअध्यापक डॉ. सुरेश मिक्कीली, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य संशोधक डॉ. पी. वेथामनी व ज्येष्ठ संशोधक डॉ. दरबार रे, कॅप्टन आॅफ पोर्ट खात्याचे तांत्रिक अधीक्षक स्टीफन ब्रागांझा, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव लेविन्सन मार्टिन्स व पर्यावरणविषयक अभियंते विजय कानसेकर यांनी मिळून मांडवी नदीतील पाण्याची, तसेच काही कॅसिनोंचीही पाहणी केली.
चाचणीअंती व अभ्यासाअंती या टीमने गेल्या आॅक्टोबरमध्ये कोणता अहवाल तयार केला हे यापूर्वी कधीच स्पष्ट झाले नव्हते. आता यापुढे हा अहवाल हरित लवादासमोर उघड होणार आहे. तथापि, माहिती हक्क कायद्याखाली याचिकादारास हा अहवाल प्राप्त झाला आहे. कॅसिनोंच्या मध्यभागाकडील मांडवीतील पाणी, मांडवी नदीच्या वरील भागातील पाणी व नदीच्या खालील भागातील पाणी असे तीन ठिकाणचे नमूने या तज्ज्ञांच्या टीमने १७ आॅक्टोबर रोजी हे नमूने घेतले. त्या वेळी तीनही नमून्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त ‘फेकल कॉलिफॉर्म’ आढळून आले. तज्ज्ञांनी सही केलेल्या अहवालाची प्रत ‘लोकमत’कडे आहे. कॅसिनोंमुळेच हे प्रमाण वाढले, असा निष्कर्ष मात्र अहवालात काढला गेलेला नाही. (खास प्रतिनिधी)