मराठी राजभाषा होणे काळाची गरज: आमदार जीत आरोलकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:24 IST2025-07-30T13:22:53+5:302025-07-30T13:24:43+5:30
मराठी भाषेला हक्काचे स्थान मिळेपर्यंत मराठी जनतेबरोबर राहण्याची ग्वाही

मराठी राजभाषा होणे काळाची गरज: आमदार जीत आरोलकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : पेडणे तालुक्यातील सर्वाधिक लोकांची मराठी ही त्यांच्या व्यवहाराची भाषा आहे. धार्मिक, सांस्कृतिक, वाचन, संगीत आदी सर्व गोष्टी पेडणेवासीय मराठीतूनच करतात. त्यामुळे पेडणेकरांची व्यावहारिक भाषा असलेली मराठी राजभाषा होणे, ही काळाची गरज आहे. कोकणीबरोबर मराठी ही दुसरी राजभाषा झाल्यास धार्मिक सलोखा आणि गोमंतकीयांचे ऐक्य टिकून राहू शकते, असे प्रतिपादन आमदार जीत आरोलकर यांनी केले.
त्रिसुपर्ण या साहित्यिक संस्थेतर्फे पेडणेतील मराठी प्रेमी नागरिकांनी आमदार आरोलकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी भास्कर नारुलकर, राजमोहन शेट्ये, उमेश गाड, विठोबा बगळी, विश्वनाथ आजगावकर, संदेश सावंत, विजय परब, भगवान शेटकर, चंद्रकांत सावळदेसाई, सागर तिळवे, दत्ताराम ठाकूर आदी उपस्थित होते. आमदार आरोलकर म्हणाले, पेडणे तालुका हा मराठीचा बालेकिल्ला आहे. याच भाषेमध्ये कला, शिक्षण संस्कृती तसेच इतर व्यवहार होतात.
आपण इंग्रजी माध्यमांतून शिकलो असलो तरी त्यानंतर माझे शिक्षण मराठी भाषेतूनही झाले याचा मला सार्थ अभिमान आहे. माझ्या गावातील देवस्थाने तसेच इतर धार्मिक कार्यामध्ये प्रत्येक गोष्टीत मराठी भाषेचा उपयोग केला जातो, असे आमदार आरोलकर यांनी सांगितले.
मराठीचे बाळकडू पाजले
माझ्या घरी माझ्यावर मराठीचे संस्कार झाले आहेत. मराठीचे बाळकडू मला पाजले आहे. आरती, फुगड्या, लग्नपत्रिका इतकेच नव्हे तर मराठी भाषेतीलच वर्तमानपत्रे पेडणे तालुक्यात वाचली जातात. यावरून मराठी भाषेचे महत्त्व लक्षात येते, असे ते म्हणाले. त्यामुळे तिला हक्काचे स्थान मिळायलाच हवे, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.
कोकणीला विरोध नाही
विधानसभेत मी जर मराठीत बोललो असतो तर विरोधकांना समजले नसते. हा विषय सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठीच आपण मुद्दाम कोकणीतून बोललो. कोकणीला माझा विरोध नाही; परंतु माझी मराठी ही दुसरी राजभाषा व्हावी, अशी माझ्याबरोबर अनेक गोमंतकीयांची इच्छा आहे. ती पूर्ण होण्यासाठी आपण लढा देणार असल्याचे आमदार आरोलकर यांनी सांगितले.