माझी बस योजना १६ पासून स्थगित; नवी योजना येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 07:19 IST2025-05-13T07:19:16+5:302025-05-13T07:19:57+5:30
सरकार लवकरच याबाबतीत नवी योजना आणणार आहे.

माझी बस योजना १६ पासून स्थगित; नवी योजना येणार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : खाजगी बसमालकांनी विरोध केलेली २०२३ ची 'माझी बस' योजना १६ मेपासून स्थगित करण्यात आली आहे. तशा आशयाची नोटीस कदंब महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सोमवारी काढली. सरकार लवकरच याबाबतीत नवी योजना आणणार आहे.
जून २०१८ पासून इंधन सबसिडीची ३६ कोटी रुपये थकबाकी असताना नवीन योजनेला बसमालकांनी तीव्र विरोध केला आहे. अखिल गोवा खाजगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर म्हणाले की, ही थकीत सबसिडी मिळाल्याशिवाय नवीन योजनेला आम्ही सहकार्य करणार नाही. २०२३ च्या माझी बस योजनेचा लाभ ५७जणांनी घेतला. काणकोण व कुडचडेतील काही बसमालकांचा यात समावेश आहे.
सरकारने आतापर्यंत या योजनेत ११ कोटी ६६ लाख रुपये वितरित केले. सत्ताधारी आमदार नीलेश काब्राल यांच्या मालकीच्या चार बसगाड्यांसाठी यातील १ कोटी ७ लाख रुपये दिले गेले. २०१८ पासूनच आमची इंधन सबसिडी थकीत असताना करदात्यांच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी चालल्याने आम्ही या योजनेला विरोध केला होता.