'माझे घर'लाही आणलेला अडथळा; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:04 IST2025-10-15T08:03:47+5:302025-10-15T08:04:11+5:30
वास्को, दाबोळी मतदारसंघात योजनेचे अर्ज वितरित

'माझे घर'लाही आणलेला अडथळा; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : सरकारी आणि कोमुनिदाद जागेतील गोमंतकीयांची अनधिकृत घरे कायदेशीर करण्यासाठी 'माझे घर' योजना अंमलात आणण्यात येणार असल्याचे कळताच विरोधकांनी त्याला तीव्र विरोध करायला सुरुवात केली होती. पण सरकारने घेतलेल्या ठाम निर्णयानुसार ही योजना अमलात आली, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी येथे सांगितले.
मंगळवारी (दि. १४) मुरगाव तालुक्यातील वास्को आणि दाबोळी मतदारसंघात 'माझे घर' योजनेचे अर्ज वितरित करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. दोन्ही ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वास्को येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, नगरसेवक दीपक नाईक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस, मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी, मामलेदार प्रवीणजय पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रत्येकाला मिळेल हक्काचे घर : माविन गुदिन्हो
दाबोळी मतदारसंघातील अर्ज वितरित करण्यासाठी चिखली पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात मंत्री गुदिन्हो म्हणाले की, प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले आहे. दाबोळीतील सरकारी व कोमुनिदाद जमिनीवरील घरे 'माझे घर' योजनेंतर्गत भविष्यात नियमित होणार आहेत. याचे पूर्ण श्रेय भाजप सरकारबरोबर जनतेला जाते.
योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांना : कृष्णा साळकर
वास्को मतदारसंघात अर्ज वितरित करण्यासाठी झेड स्क्वेअर सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी आमदार साळकर म्हणाले की, 'माझे घर' योजनेमुळे शेकडो कुटुंबीयांची घरे नावावर होणार आहे. सरकारी आणि कोमुनिदाद जागेत अनेक वर्षापासून असलेल्या अनधिकृत घरांच्या मालकांना भीती वाटत होती. अशी कुटुंबे या योजनेमुळे आनंदित झाली आहेत. या योजनेचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्र्यांनाच जाते.