कुटुंबाच्या स्थैर्यासाठीच माझे घर योजना : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 09:32 IST2025-11-02T09:31:35+5:302025-11-02T09:32:52+5:30
कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर तुळशी वृंदावनाला हार व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले.

कुटुंबाच्या स्थैर्यासाठीच माझे घर योजना : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, मडकई: आपल्या घराविषयी जास्त चिंता असते ती महिलांना. घर उभारण्यासाठी त्या अथक परिश्रम घेतात. त्यासाठी मिळेल तेथून त्या पैसे उभारतात. त्यामुळे सरकारने घरे कायदेशीर करण्यासाठी 'माझे घर' योजना आणली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. मडकई मतदारसंघात माझे घर योजनेच्या अर्ज वाटपप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मंत्री सुदिन ढवळीकर, जि. पं. सदस्य गणपत नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर तुळशी वृंदावनाला हार व पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी कवळेचे सरपंच मनोज नाईक, तळावलीच्या सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, सरपंच चंदन नाईक, बांदोडाचे सरपंच रामचंद्र नाईक, सरपंच विशांत नाईक, अतिरिक्त जिल्हाधिकारी विकास परब आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, पुढच्या पिढीला कुठलाही त्रास न करता स्वतःचे घर असावे, यासाठी सरकारने ही योजना राबवलेली आहे. त्यामुळे राज्यात एकही बेकायदा घर राहणार नाही.
अतिशय सुटसुटीत योजना : मंत्री सुदिन ढवळीकर
मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सर्वांचे स्वागत केले. ते म्हणाले की, राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी कुळ आणि मुंडकार योजनेला प्रारंभ केला होता. त्यावेळी १९७२ मध्ये एकदाच सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुटसुटीत योजना तयार केली आहे. या संकल्पनेखाली त्या त्या मालकाच्या नावावर घरे होतील.