स्वच्छता ठेवा, १० लाख मिळवा: विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:59 IST2025-09-18T14:58:41+5:302025-09-18T14:59:17+5:30
पालिकांना पुरस्कार जाहीर, जीसुडातर्फे २ कोटींचा प्रकल्प संधी

स्वच्छता ठेवा, १० लाख मिळवा: विश्वजित राणे
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सर्वात स्वच्छ पालिकांना आता अनुक्रमे १० लाख, ५ लाख व ३ लाख रुपये क्रमवारीनुसार पुरस्कार दिला जाईल. तसेच पहिला क्रमांक पटकावणाऱ्या पालिकेला जी सुडा अंतर्गत १ ते २ कोटी रुपयांपर्यतचा प्रकल्प मंजुर केला जाईल, असे शहरी विकास मंत्री विश्वजित राणे यांनी जाहीर केले.
राज्य शहरी विकास खाते व गोवा राज्य शहरी विकास एजन्सीकडून (जी सुडा) स्वच्छताही सेवा या उपक्रमाचा शुभारंभ पणजीत झाला. या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याची सुरुवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल आम्ही टाकून पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मंत्री राणे म्हणाले की, राज्यातील पणजी महानगरपालिका तसेच पालिकांना स्वच्छतेच्या दिशेने प्रोत्साहन देणे, तसेच शहरी विकास पायाभूत सुविधा व नागरी सेवांना चालना देण्याच्या उद्देशाने सरकार आता पालिकांना स्वच्छता विभागात पुरस्कार देणार आहे. राज्यातील सफाई कामगार हे स्वच्छता राखण्यासाठी महत्त्वाचे घटक आहे. त्यांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देण्याच्या उद्देशाने त्यांची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. आरोग्य खात्याकडून त्यांना हेल्थ कार्ड जारी केले जातील, असे मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
या पुरस्कारांमुळे शहर स्वच्छतेला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत अधिक जागृती निर्माण होईल. स्वच्छता ही सेवा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पालिका नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच नगरसेवकांनी सहकार्य करावे. - विश्वजित राणे, शहरी विकास मंत्री.