महाराष्ट्रातील एसटी संपाचा गोव्याला फटका, कदंबची बससेवा स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2018 14:05 IST2018-06-08T14:05:29+5:302018-06-08T14:05:29+5:30
महाराष्ट्रातील एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून (8 जून) पुकारलेल्या संपाचा मोठा फटका गोमंतकीयांनाही बसला आहे. गोव्याहून सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळातर्फे रोज पाठवल्या जाणा-या 34 बसगाड्या आज महाराष्ट्रात पाठवल्या गेल्या नाहीत.

महाराष्ट्रातील एसटी संपाचा गोव्याला फटका, कदंबची बससेवा स्थगित
पणजी : महाराष्ट्रातील एसटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून (8 जून) पुकारलेल्या संपाचा मोठा फटका गोमंतकीयांनाही बसला आहे. गोव्याहून सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळातर्फे रोज पाठवल्या जाणा-या 34 बसगाड्या आज महाराष्ट्रात पाठवल्या गेल्या नाहीत. कदंब महामंडळाचे यामुळे सरासरी चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती महामंडळाच्या अधिका-यांकडून प्राप्त झाली.
गोव्याहून रोज कदंबच्या बसगाड्या केवळ पुणे, मुंबई व शिर्डीच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक छोट्या शहरांतही जात असतात. रोज हजारो प्रवासी गोव्याहून या बसगाड्यांद्वारे महाराष्ट्रात प्रवास करतात. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात गोव्याच्या कदंब महामंडळाच्या अनेक बस जातात. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, देवगड, मिरज, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर व अन्य भागांमध्ये रोज पणजीहून कदंबच्या बसगाडय़ा जातात. शुक्रवारी महाराष्ट्रातील एसटीच्या संपामुळे गोव्याहून सकाळी कदंबच्या काही बसगाड्या फक्त बांदा-सावंतवाडी अशा सीमेवरील भागापर्यंतच पाठवण्यात आल्या. त्यानंतर सगळ्या 34 बसगाडय़ा पुढे कुठेच पाठवल्या गेल्या नाहीत. महाराष्ट्रातील संपावेळी दरवेळी गोव्याकडून खबरदारी घेतली जाते. गोव्यातील बसगाडय़ांवर महाराष्ट्रात दगडफेक होऊ नये म्हणून तिथे संप काळात बसगाडय़ाच पाठवणे कदंब महामंडळ बंद करत असते. काही महिन्यांपूर्वी म्हादई पाणी प्रश्नी कर्नाटकमध्ये झालेल्या आंदोलनावेळीही गोव्याच्या कदंब महामंडळाने कदंबच्या बसगाड्या कर्नाटकमध्ये पाठविणे बंद केले होते व त्याचा आर्थिक फटका महामंडळाला सहन करावा लागला होता.
कदंब महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी श्री. घाटे यांनी शुक्रवारी लोकमतला सांगितले, की महाराष्ट्रात जाणा-या कदंबच्या बसगाड्यांमुळे रोज कदंबला चार ते साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असते. महाराष्ट्रातील काही मार्गावर कदंबच्या बसगाड्यांना प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद असतो. एसटी कर्मचा-यांचा संप मिटेपर्यंत आम्ही गोव्याहून कदंबच्या बसगाडय़ा महाराष्ट्रात पाठवणार नाही.
दरम्यान, गोव्याहून पुणे, मुंबईला ज्या खासगी बसगाड्या जातात, त्या सुरू राहिल्याची माहिती मिळाली. गोव्याहून गुरुवारी रात्री खासगी बसगाड्या मुंबई व पुण्याला गेल्या. खासगी बसगाडय़ांचे प्रमाणही मोठे आहे. कदंबच्या बसगाडय़ा सकाळी महाराष्ट्रात न गेल्याने व महाराष्ट्रातूनही एसटी गोव्यात न आल्याने गोमंतकीय प्रवाशांची गैरसोय झाली.