लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रियोळ व मांद्रे भाजपच लढवणार. युती मान्य नसेल, तर चालते व्हा, असे मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात बजावल्यानंतर मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर व अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मंगळवारी तातडीने दिल्ली गाठून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतली व युतीविषयी चर्चा केली.
दुसरीकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक दिल्लीहून परतले व त्यानंतर दुपारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठकही झाली. मात्र, या बैठकीत युतीविषयी चर्चा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. येत्या ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिन आहे. मंत्रिमंडळ फेररचनेला या दिवसाचा मुहूर्त साधून फेरबदल केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा
'लोकमत'ने दीपक ढवळीकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बी. एल. संतोष यांची आम्ही भेट घेतलेली आहे. त्यांच्यासोबत युतीसह सध्याच्या घडामोडींबाबत चर्चा केली आहे. सायंकाळी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार होतो. मात्र, त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. १० रोजी त्यांना पुन्हा दिल्लीत जाऊन भेटणार आहे.
भेटीत काय घडले?
मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून सत्तेत घटक असलेल्या मगो पक्षाची कोंडी होत आहे. काही वक्तव्ये ठराविक मर्यादेपर्यंतच ठीक असतात. विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे असताना युतीचा विषय आताच का उपस्थित व्हावा? मुख्यमंत्र्यांनी असा इशारा आताच का द्यावा ? असे प्रश्न ढवळीकर बंधूंनी बी. एल. संतोष यांच्याकडे उपस्थित केल्याचे समजते. केंद्रीय नेत्यांच्या शब्दावरच मगोपने युती केली होती. याकडेही संतोष यांचे लक्ष वेधण्यात आले.