२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 10:00 IST2025-12-16T10:00:56+5:302025-12-16T10:00:56+5:30
Goa Night Club Fire: ६ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये ही विनाशकारी आग लागली होती. या आगीत ५ पर्यटकांसह एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता.

२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
गोवा येथील एका नाईट क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ लोकांचा बळी घेणाऱ्या प्रकरणातील प्रमुख आरोपी, गौरव लूथरा आणि सौरभ लूथरा यांना अखेर थायलंडमधून भारतात परत आणण्यात येत आहे. थायलंडमध्ये त्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाचे पथक मायदेशी निघणार आहे.
६ डिसेंबरच्या रात्री गोव्यातील अरपोरा येथील 'बर्च बाय रोमियो लेन' या नाईट क्लबमध्ये ही विनाशकारी आग लागली होती. या आगीत ५ पर्यटकांसह एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी दिल्लीत असलेले क्लबचे मालक असलेले लूथरा बंधू तत्काळ थायलंडला पळून गेले होते.
इंटरपोल आणि भारतीय उच्चायोगाच्या मदतीने ही कारवाई पूर्ण करण्यात आली. बँकॉक विमानतळावर प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीबीआयचे पथक दोन्ही आरोपींना घेऊन थेट दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत दाखल झाल्यावर लूथरा बंधूंना पटियाला हाऊस कोर्टात हजर केले जाणार आहे. यानंतर त्यांना गोव्यात आणले जाणार आहे.