गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

By किशोर कुबल | Updated: August 23, 2023 19:57 IST2023-08-23T19:57:37+5:302023-08-23T19:57:47+5:30

महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले.

Low proportion of female representatives, female workers in Goa; President Draupadi Murmu expressed concern | गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

गोव्यात महिला लोकप्रतिनिधी, महिला कामगारांचे प्रमाण कमी; द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली चिंता

पणजी : गोव्यात महिला लोकप्रतिनिधी व महिला कामगारांची संख्या कमी असल्याने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यानी चिंता व्यक्त करीत हे चित्र बदलले पाहिजे, असे प्रतिपादन केले.

महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले. मुर्मूजी म्हणाल्या की, ‘ मनुष्यबळाच्या बाबतीत तसेच विधानसभेत मला महिलांचे प्रमाण कमी दिसले. सार्वजनिक जीवनात महिलांचा अधिकाधिक सहभाग दिसायला हवा.’

‘सभागृहात विधिमंडळ सदस्यांनी सभ्यतेने वागले पाहिजे’
राष्ट्रपती म्हणाल्या की,‘गोवा विधानसभेने वेळोवेळी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. विधानसभा अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले जाते ही चांगली बाब आहे. सभागृहात विधिमंडळ सदस्यांचे व्यवहार सभ्यतेचे असायला हवेत. कारण आपला लोकप्रतिनिधी कसा वागतो याकडे मतदारांचे लक्ष असते.’

राष्ट्रपती म्हणाल्या की,‘ मुक्तीनंतर गोव्याने अभूतपूर्व प्रगती केली.गोवा खनिजाच्या बाबतीत  समृध्द आहे. मॅगनिझ, बॉक्साइट साठे येथे मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यावरण सांभाळून खाण व्यवसाय व्हावा.’ त्या पुढे म्हणाल्या की,‘ फार्मा, बायोटॅक्नॉलॉजी व आयटी क्षेत्रात गोव्याची कामगीरी चांगली आहे. औषध निर्यातीत देशभरात गोव्याचा चौथा क्रमांक लागतो. एकूण निर्यातीच्या दहा टक्के औषध निर्यात गोव्यातून होते ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.’

गोव्याचा विकासात ग्रामीण भागांचे वर्चस्व : राज्यपाल
राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले कि, गोव्यात सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागाचे वर्चस्व दिसून येते. गोव्याचे विधानसभा संकूल, सचिवालय, हायकोर्ट इमायत, राजभवन, विद्यापीठ सर्व काही ग्रामीण क्षेत्रात आहे. गोव्याच्या सर्वांगीण विकासात ग्रामीण भागांचे वर्चस्व आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सभापती रमेश तवडकर यांचीही भाषणे झाली.

Web Title: Low proportion of female representatives, female workers in Goa; President Draupadi Murmu expressed concern