कोकण रेल्वेतून दारू तस्करी
By Admin | Updated: July 28, 2014 02:19 IST2014-07-28T02:19:04+5:302014-07-28T02:19:57+5:30
मोठ्या टोळीचा संशय : वर्चस्वासाठी एकमेकांवर प्राणघातक हल्ले

कोकण रेल्वेतून दारू तस्करी
सूरज पवार-मडगाव : दारू तस्करीसाठी कोकण रेल्वेमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. या गैरव्यवहारात गुंतलेली धेंडे आता आपल्या धंद्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी एकमेकांना संपविण्यासही मागेपुढे पाहात नाहीत. गेल्या आठवड्यात दारूच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या दोन गटांनी भररस्त्यावरच हाणामारी करून त्याची झलकही दाखवून दिली आहे.
याबाबत वेळीच पोलिसांनी कारवाई केली नाही तर भविष्यात हा धोका कायम असेल, ही भीती आता मडगावकरांना सतावू लागली आहे.
दोन वर्षांपूर्वी अशाच एका घटनेत पोलिसांना टिप्स देत असल्याच्या संशयावरून चारजणांना बेदम मारहाण करण्यात आली होती, तर मागच्या आठवड्यात बुधवारी मालभाट येथे भररस्त्यावर दोन गँगमध्ये राडा झाला होता. या वेळी चाकू, दंडुक्यांचाही वापर करण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे. मालभाट येथे सुजित सिंग व कृष्णा पिल्ले या दोन गटांत हाणामारी झाली होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही गट दारूच्या तस्करीत गुंतलेले आहेत.
काही वर्षांपूर्वी रेल्वे सुरक्षा बलाच्या एका अधिकाऱ्याने दारू तस्करीविरोधात पावले उचलली होती. त्यातून या अधिकाऱ्याला गोळीबारही करावा लागला होता. त्यात एका इसमाचा मृत्यू झाल्यानंतर माागाहून त्या अधिकाऱ्याला खुनाच्या गुन्ह्याखाली तुरुंगातही जावे लागले होते. अशा गोष्टीची पृनरावृत्ती होऊ नये यासाठी आता कोकण रेल्वे पोलीस विभाग तसेच रेल्वे सुरक्षा दलाला आतापासून मोहीम उघडून दारूच्या तस्करीत गुंतलेल्यांचा बीमोड करावाच लागेल.
कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तगुरूसांवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात दारू जप्त केल्याने दारू ‘स्मगलिंग’ करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
चालू वर्षात रेल्वे पोलिसांनी जानेवारी महिन्यात एका प्रवाशाकडून ३0 हजारांची दारू जप्त केली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात रेल्वेतून दारूची तस्करी करत असल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी प्रदीप पांडे याला अटक केली होती. यंदा फेब्रुवारी महिन्यातही मध्यरात्री हाच संशयित पोलिसांच्या जाळ्यात सापडला होता. त्याला अन्य दोन साथीदारांसमवेत ९0 हजार रुपयांच्या दारूसह पोलिसांनी जेरबंद केले होते.
शेजारच्या राज्यात दारूची किंमत जास्त असल्याने गोव्यातून रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत आहे. गेल्या काही महिन्यांत कोकण रेल्वे पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्यांविरुध्द मोहीम उघडून लाखो रुपये किमतीची दारू जप्त केली होती.
गेल्या जुलै महिन्यात कोकण रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकावर दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीस हजार रुपये किमतीची विविध उत्पादनांची दारू जप्त केली होती. लॅन्सी कार्स्टा व नवीन कुमार अशी या दोघा संशयितांची नावे असून, ते केरळ राज्यातील कासरगोड येथील असल्याचे तपासात आढळून आले होते. गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेश येथील राजू सिंग याला अटक करून त्याच्याकडून २ हजार ८८0 रुपये किमतीची दारू जप्त केली होती. मे महिन्यात रिमा दा कॉस्ता याला ताब्यात घेऊन १0 हजार ५४0 रुपयांची दारू जप्त केली होती. सध्या पोलिसांकडे खबऱ्यांची वानवा असल्याने अनेकदा अनेक क्लृप्त्या वापरून भरदिवसा मोठ्या प्रमाणात दारू तस्करी होत आहे.